मुरूड : प्रतिनिधी
कोकणाचा कॅलिफोर्निया बनवण्याचे स्वप्न माजी मुख्यमंत्री बॅरिस्टर ए. आर. अंतुले यांनी बाळगले होते. ते स्वप्न आता शिवसेना व भाजप युती सरकार पूर्ण करू शकेल, अशी माझी खात्री आहे. यासाठी कोकणात शिवसेनेचे खासदार व आमदार निवडून येणे खूप आवश्यक आहे, असे प्रतिपादन शिवसेनेचे नाविद अंतुले यांनी शिघ्रे (ता. मुरूड) येथे जाहीर प्रचाराच्या तोफा थंडावण्यापूर्वी झालेल्या सभेत केले.
पर्यटनविषयक सर्व सुविधा मिळवण्यासाठी शासनाचे योगदान खूप आवश्यक असून, आगामी काळात पर्यटनाला चालना देण्याचे काम हे शिवसेनेच्या माध्यमातून होणार आहे, असा विश्वास नावीद अंतुले यांनी या वेळी केला.
अल्पसंख्याक सेलचे अध्यक्ष उस्मान रोहेकर, बोर्ली ग्रामपंचायतीचे सरपंच नौशाद दळवी यांनी महायुतीचे उमेदवार अनंत गीते याना प्रचंड मतांनी विजयी करण्याचे आवाहन केले.
शिवसेना तालुका प्रमुख ऋषिकांत डोंगरीकर, शिघ्रे ग्रामपंचायत सरपंच संतोष पाटील, माजी सरपंच मनोज कमाने, मुरूड नगर परिषदेचे पाणीपुरवठा सभापती प्रमोद भायदे, नगरसेवक विजय पाटील, नगरसेविका युगा ठाकूर यांच्यासह मुस्लिम बांधव या सभेला मोठ्या संख्येने उपस्थित होते.