Breaking News

व्यायाम मंदिराच्या बचावासाठी कर्जतमधील जुने कार्यकर्ते आक्रमक

कर्जत : प्रतिनिधी, बातमीदार

ब्रिटिशांनी कर्जत शहरात 1870 मध्ये सुरू केलेल्या टेनिस कोर्टची जागा, लीज संपल्याचे दाखवून हडप करण्याचा बिल्डर लॉबीचा प्रयत्न असून, तो आम्ही हाणून पाडणार आणि सध्याचे हुतात्मा कोतवाल व्यायाममंदिर खेळासाठी आरक्षित ठेवणार असल्याचा निर्धार बचाव समितीने केला आहे. कर्जत येथील हुतात्मा व्यायाम मंदिराबाबत पत्रकार परिषद घेऊन ज्येष्ठ खेळाडूंनी आक्रमक भूमिका जाहीर

केली आहे.

कर्जत शहारत सिटी सर्व्हे नंबर 174 मधील पावणे दोन एकर जागेवर हुतात्मा कोतवाल व्यायाम मंदिर उभे आहे. शासनाने ‘ड’ सत्ता प्रकारमधील ही जागा एक रुपया नाममात्र भाडेपट्ट्यावर व्यायामासाठी राखीव म्हणून दिली होती. धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडे नोंद असलेल्या या जागेची लीज संपली होती आणि कर्जत तहसील कार्यालयाच्या महसूल विभागाने सदर लीज भरून घेतली आणि या जागेचा व्यावसायिक वापर करण्यासाठी हालचाली सुरू झाल्या होत्या. त्याबाबत माहिती मिळताच कर्जत शहरातील जागरूक नागरिक आक्रमक झाले आहेत. त्यांनी हुतात्मा कोतवाल व्यायाम मंदिर बचाव समितीची स्थापना केली आहे. या समितीने सदर जागा आणि मैदान खेळासाठी राहिले पाहिजे, यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत, मात्र कर्जत नगरपालिकेत या जागेवर 19 व्यावसायिक गाळे बांधण्याचा प्रस्ताव सादर केला आहे. दरम्यान, बचाव समितीने शहरातील ब्राह्मण सभागृहात घेतलेल्या पत्रकार परिषदेत राष्ट्रीय दर्जाचे वेटलिफ्टर नारायण जाधव आणि संस्थेचे तहहयात विश्वास गोडसे यांच्यासह हा लढा नोव्हेंबर 2018 पासून लढणारे वकील हृषीकेश जोशी यांनी, विद्यमान संचालक मंडळाने त्या जागेचे व्यावसायिक जागेत रूपांतर करण्यासाठी सुरू केलेल्या हालचालींची माहिती दिली.

लीज भरण्यासाठी संस्थेने आवाहन केले असते, तर 25 लाख ही रक्कम कर्जतमधील तरुणांनी उभी केली असती, मात्र पावणेदोन एकर जागा बिल्डरच्या घशात घालण्यासाठी लीज संपली आहे आणि जागा सरकार जमा होणार आहे, याबाबत गुप्तता पाळण्यात आली, असा आरोप बचाव समितीने केला.शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या जागेचा वापर व्यावसायिक वापरासाठी करण्याकरिता केवळ बांधकाम करण्याची निविदा प्रचलित नसलेल्या वृत्तपत्रात दिली, असा आरोप अ‍ॅड. जोशी यांनी केला. मैदान वाचावे, यासाठी आम्ही प्रयत्न करणार असून जुन्या कोणत्याही सभासदांना विश्वासात न घेता मैदान बिल्डरच्या घशात घालण्याचा प्रयत्न सुरू आहे, ते आम्ही यशस्वी होऊ देणार नाही, असा निर्धार माजी खेळाडू आणि कर्जत शहरातील ज्येष्ठ नागरिक यांनी व्यक्त केला.

मला समितीवरून पायउतार करताना कोणत्याही प्रकारची नोटीस दिली नाही, मी या संस्थेचा आजीव सदस्य आहे, मैदान हे मैदान राहावे, अशी माझी भूमिका आहे, तसे धर्मदाय आयुक्त व शासकीय व्यवस्थापनाला मी कळवले आहे.
-विश्वास गोडसे, आजीव सदस्य,
हुतात्मा कोतवाल व्यायाममंदिर, कर्जत

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply