सराफ आणि ज्वेलर्स असोसिएशनची मागणी
पनवेल : वार्ताहर
पनवेलच्या ज्वेलर्स आणि सराफ असोसिएशनने महानगरपालिकेचे आयुक्त सुधाकर देशमुख यांच्याकडे ज्वेलरी मार्केट सुरू करावे, अशी मागणी एका पत्राद्वारे केली आहे.
कोरानाच्या महामारीचा आर्थिक फटका अनेक उद्योजक, व्यापारी छोटे व्यावसायिक यांना बहुतांश ठिकाणी बसल्याने व्यापारी मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. त्याचप्रमाणे ज्वेलरी दुकाने बंद असल्याने दुकानाची भरमसाठ भाडी मालकांच्या अंगावर पडली आहेत. तसेच या ज्वेलरी धंद्यावर पूर्णत: अवलंबून असणारे सेल्समन दागिने (घडणावळ) करणारे कारागिर बंद दुकानामुळे त्यांच्या हाताला काम शिल्लक राहिलेले नाही. कारागिर वर्गानेही भाड्याने दुकाने घेऊन स्वतःकडे अनेक कारागिर ठेवले आहेत त्यांचे पगारही ज्वेलर्स बंद असल्याने काम नसल्याने ते देऊ शकत नाहीत छोटे छोटे कारागिर वर्ग यांच्यावरही उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे. याचा सारासार विचार करून आम्हाला आठवड्यातून तीन दिवस ज्वेलर्स दुकाने सुरू करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी असोशियनचे अध्यक्ष चतरलाल मेहता व उपाध्यक्ष मोतीलाल बी. जैन यांनी केली आहे.
शासनाच्या अटी व शर्थीचे काटेकोर पालन करून सोशल डिस्टन्सिंग आदेशाची आमच्याकडून योग्य प्रकारे दखल घेतली जाईल. आमच्या ज्वेलर्स दुकानात सर्व साधारण किरकोळ ग्राहक वर्गाची संख्या असते. अन्य दुकानासारखी आमच्या ज्वेलर्समध्ये ग्राहकांची वर्दळ नसते असेही ज्वेलर्स सराफ आणि असोसिएशनतर्फे सांगण्यात आले तरी आमच्या मागणीचा सारासार विचार करून ज्वेलर्स दुकाने सुरू करण्याची परवानगी मिळावी, अशी मागणी व्यापारी वर्गाने महानगरपालिकेकडे केली आहे.