अलिबाग ः प्रतिनिधी
मुंबईत सिद्धिविनायकाचे दर्शन घेऊन मी मंगळवारी (दि. 28) माझ्या कोल्हापूर यात्रेला प्रारंभ करणार आहे. कोल्हापूरला पोहचल्यावर माझ्यावर आजन्म प्रवेशबंदी घालणार्या मुरगुड नगर परिषदेच्या हद्दीत जाऊन महाराष्ट्राचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करणार आणि तेथेच मुश्रीफ यांचा तिसरा घोटाळा उघड करणार. हिंमत असेल तर कारवाई करून मला अटक करून दाखवावी, असे खुले आव्हान भाजप नेते माजी खासदार डॉ. किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडी सरकारला दिले आहे. अलिबाग व मुरूड तालुक्यातील भाजप पदाधिकार्यांची संयुक्त आढावा बैठक रविवारी (दि. 26) अलिबाग येथील हिरालक्ष्मी सभागृहात आयोजित करण्यात आली होती. त्या वेळी सोमय्या बोलत होते. भाजप दक्षिण रायगड जिल्हा अध्यक्ष अॅड. महेश मोहिते, अलिबाग तालुका अध्यक्ष परशुराम म्हात्रे, शहर अध्यक्ष अॅड. अंकित बंगेरा, प्रदेश कार्यकारिणी सदस्य सतीश लेले, शहर सरचिटणीस अजय भाकरे, संतोष पाटील यांच्यासह अलिबाग व मुरूड तालुक्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते या बैठकीला उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देश भ्रष्टाचारमुक्त करण्याची मोहीम सुरू केली आहे. आपल्या पक्षाने माझ्यावर महाराष्ट्र भ्रष्टाचारमुक्त करण्याची जबाबदारी सोपवली आहे. ती मी पार पाडणार आहे. त्याची सुरुवात झाली आहे. मला कितीही अडविण्याचा प्रयत्न केला, प्रवेशबंदी केली, जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या तरी मी घाबरणार नाही. मी माझे काम करीत राहणार. महाराष्ट्र भ्रष्टाचारमुक्त करणार. महाराष्ट्राच्या जनतेने आता भ्रष्टाचाराविरोधात क्रांती सुरू केली आहे. ती कुणी थांबवू शकणार नाही. पक्षातील कार्यकर्त्यांनी धाडस दाखवून आपला तालुका भ्रष्टाचारमुक्त करण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन किरीट सोमय्या यांनी कार्यकर्त्यांना केले. महाराष्ट्राचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीम यांच्या विरोधात दोन भ्रष्टाचाराचे आरोप मी केले आहेत. मला अटक करून गणेश विसर्जनाला जाऊ दिले नाही. कोल्हापुरात जाऊन मला अंबामातेचे दर्शन घ्यायचे होते. तेथे जाऊ दिले नाही. या हसन मुश्रीफांविरोधात मी 28 सप्टेंबरला पोलिसांकडे तक्रार नोंदवणार असून मुश्रीफ यांना चांगलाच धडा शिकवणार आहे, असे सोमय्या म्हणाले. ठाकरे व वायकर यांनी अन्वय नाईक यांच्याकडून मुरूड तालुक्यातील कोर्लई येथील जमीन खरेदी केली. या जमीन खरेदी व्यवहारात 19 बंगले दाखविण्यात आले होते. आमदार प्रशांत ठाकूर व अॅड. महेश मोहिते यांना घेऊन मी त्या जागेची पाहणी केली. तेव्हा ज्या जमीन व्यवहार खरेदीत या जमिनीवर 19 बंगले दाखविण्यात आले होते ते गायब आहेत असे दिसले. ते शोधण्याचा आम्ही प्रयत्न करीत आहोत. ते सापडले की रवींद्र वायकर यांना दाखवू. ज्यांचे हरवलेले बंगले शोधून देण्याचा आम्ही प्रयत्न करीत आहोत तेच आमच्यावर अब्रुनुकसानीचा दावा करत आहेत हे अनाकलनीय आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी रात्री लपत जाऊन ईडीच्या कार्यालयात 53 लाख रुपये भरलेत. म्हणजेच ते भ्रष्टाचारानेच कमवलेले होते. अशा भ्रष्टाचारी संजय राऊतांनी आम्हाला शिकवू नये, असे सोमय्या यांनी सांगितले. महाविकास आघाडीत सर्व पक्ष आमचे शत्रू आहेत. त्यांचा भ्रष्टाचार शोधून काढून तो चव्हाट्यावर आणणार. त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करणार. कोर्लई येथील जमीन खरेदी व्यवहार प्रकरणाच्या लढाईत आम्ही किरीट सोमय्या यांच्यासोबत राहणार, असे अॅड. महेश मोहिते या वेळी म्हणाले. उपस्थितांचे स्वागत परशुराम म्हात्रे यांनी व सूत्रसंचालन संतोष पाटील यांनी केले, तर अॅड. अंकित बंगेरा यांनी आभार मानले.
कर्नाळा बँक ठेवीदारांचे पैसे परत मिळवून देऊ!
कर्नाळा बँक घोटाळा प्रकरणात शेेकापचे माजी आमदार विवेक पाटील यांना अटक होऊन तीन महिने झाले, पण महाविकास आघाडी सरकार त्यांची मालमत्ता जप्त करीत नाही. आम्ही विवेक पाटील यांची 700 कोटींची मालमत्ता विकायला लावून त्यातून 52 हजार ठेवीदारांचे पैसे परत मिळवून देऊ, असे सोमय्या म्हणाले.