Breaking News

रायगडात कांदळवन निसर्ग पर्यटन बहरणार; काळींजे, दिवेआगर येथे पहिला पथदर्शी प्रकल्प

पाली : प्रतिनिधी

कांदळवन संरक्षण व उपजीविका निर्माण योजने अंतर्गत श्रीवर्धन तालुक्यातील काळींजे व दिवेआगर या गावांमध्ये कांदळवन निसर्ग पर्यटन हा रायगड जिल्ह्यातील पहिला पथदर्शी प्रकल्प राबविण्यात येत आहे. कांदळवन कक्ष रायगड आणि कांदळवन प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने नुकताच कांदळवन निसर्ग पर्यटनाचा आढावा घेण्यात आला. आगामी काही दिवसांत येथे कांदळवन निसर्ग पर्यटनास सुरुवात होईल, अशी माहिती वनक्षेत्रपाल समीर शिंदे यांनी दिली. वनपरिक्षेत्र अधिकारी श्रीवर्धन मिलिंद राऊत, निसर्ग पर्यटन सहाय्यक संचालिका वंदना झवेरी या वेळी उपस्थित होत्या.

कांदळवन निसर्ग पर्यटनाची वैशिष्ट्ये

पर्यटकांना कांदळवनाची सफर, नौका स्वारी, निसर्ग व किनारा भ्रमंती, पक्षी व तार्‍यांचे निरीक्षण, पारंपरिक व आधुनिक मासेमारी, समुद्रातील जलचरांची माहिती, नौका स्वारीदरम्यान मत्स्यपालन प्रकल्प, ऐतिहासिक स्थळांना भेटी, स्थानिक पाककृती, पारंपारिक जेवण आदी कांदळवन निसर्ग पर्यटनात अनुभवता येतील.

स्थानिकांना प्रशिक्षण व सहाय्य

कार्यशाळा आणि क्षमता बांधणी उपक्रम राबवून तज्ज्ञांमार्फत कांदळवन निसर्ग पर्यटनातील विविध बाबींचे प्रशिक्षण काळींजे व दिवेआगर गावांमधील लोकांना देण्यात आले आहे. सुरुवातीच्या तांत्रिक व आर्थिक पाठिंब्यानंतर निसर्ग पर्यटनाच्या या प्रकल्पाचे नियोजन पूर्णपणे स्थानिक समुदायाद्वारे करण्यात येईल.

काळींजे व दिवेआगर हे प्राथमिक पथदर्शी प्रकल्प आहेत. भविष्यात जिल्ह्यात असे प्रकल्प सुरू केले जातील. त्या अनुषंगाने पर्यटक वाढतील व किनारपट्टीच्या लोकांना रोजगार निर्माण होईल. जैवविधतेचे व कंदळवनांचे संरक्षण व संवर्धनदेखील होईल.

समीर शिंदे, वनक्षेत्रपाल, कांदळवन कक्ष अलिबाग

कांदळवन निसर्ग पर्यटनासाठी आवश्यक असलेली कायाक, नौका, दुर्बीण आदी विविध साहित्य शासनाकडून 90 टक्के सबसिडीने देण्यात आले आहे. त्याबरोबरच प्रशिक्षण व मार्गदर्शनदेखील दिले जात आहे. या माध्यमातून आगामी काळात येथे रोजगार निर्मिती होईल. 

-सिद्धेश कोसबे, अध्यक्ष, कांदळवन निसर्ग पर्यटन गट, दिवेआगर

Check Also

पनवेल विधानसभा क्षेत्रात नमो चषक 2025 भव्य क्रीडा महोत्सव

खारघरमध्ये भव्य क्रिकेट, कळंबोलीत कुस्ती, तर कामोठ्यात व्हॉलीबॉल, रस्सीखेच आणि फुटबॉल स्पर्धा पनवेल : रामप्रहर …

Leave a Reply