पनवेल ः रामप्रहर वृत्त
सेवा व समर्पण अभियान अंतर्गत जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे खांदा कॉलनी येथील चांगू काना ठाकूर (सीकेटी) महाविद्यालय, श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि कॅन्सर पेशंट्स ऐड असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने सीकेटी महाविद्यालयात झालेल्या गर्भाशय मुखाच्या कॅन्सरवरील प्रतिबंधात्मक लसीकरण महाशिबिरात पनवेलच्या एक हजार लेकींचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट पूर्ण झाले. त्यामुळे या महाशिबिराला उदंड प्रतिसाद लाभल्याचे दिसून आले.
या दोन दिवसीय महाशिबिराचे उद्घाटन केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या हस्ते व माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी झाले होते. या वेळी शिबिराच्या उत्तम नियोजनाबद्दल मंत्री भारती पवार यांनी भरभरून कौतुक केलेे.
गर्भाशय मुखाच्या कॅन्सरची तपासणी करण्यासाठी एचपीव्ही नामक चाचणी करावी लागते आणि ही चाचणी महागडी असल्याने महिला याकडे दुर्लक्ष करतात. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार महिलांमध्ये सर्वाधिक प्रमाण असलेल्या कॅन्सरमध्ये या कॅन्सरचा चौथा क्रमांक लागतो. महिलांमध्ये धडकी भरवणारा गर्भाशय मुखाचा कॅन्सर ही जगभर मोठी समस्या आहे. बाजारात या एका चाचणीसाठी सुमारे सात ते नऊ हजार रुपयांचा खर्च येतो. लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली व आमदार प्रशांत ठाकूर, महापौर डॉ. कविता चौतमोल यांच्या पुढाकाराने सेवा व समर्पण अभियान अंतर्गत या कॅन्सरच्या निर्मूलनासाठी लसीकरण महाशिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
महाशिबिराच्या पहिल्या दिवशी 444, तर दुसर्या दिवशी 556 मुलींचे लसीकरण होऊन एक हजार मुलींना याचा लाभ मिळाला. शिबिर यशस्वी करण्यासाठी सीकेटी महाविद्यालय, श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ, कॅन्सर पेशंट्स ऐड असोसिएशन आणि भाजप महिला मोर्चाने विशेष मेहनत घेतली.
Check Also
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून पनवेलमधील कानपोलीत विकासकामे
भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते शुभारंभ पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल विधानसभा मतदारसंघात आमदार प्रशांत …
RamPrahar – The Panvel Daily Paper