Breaking News

दिल्लीचा चेन्नईवर रोमहर्षक विजय; हेटमायरचा सुटलेला झेल ठरला मॅचचा टर्निंग पॉइंट

दुबई ः वृत्तसंस्था

आयपीएलमध्ये सोमवारी शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने बाजी मारली. दिल्लीने चेन्नई सुपर किंग्जचा तीन गडी राखून पराभव करीत गुणतालिकेत अग्रस्थानी झेप घेतली. दिल्लीच्या गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी करीत चेन्नईला 20 षटकांत 5 बाद 136 धावांवर रोखले. धावांचा पाठलाग करताना दिल्लीचा स्फोटक फलंदाज शिमरोन हेटमायरने विजयी फटका लगावला. अखेरच्या चार षटकांत दिल्ली कॅपिटल्सला 33 धावांची आवश्यकता होती. चेन्नईने जबरदस्त कमबॅक केले होते, पण सामना जिंकण्यासाठी त्यांना हेटमायर नावाचा अडथळा दूर करण्यात अपयश आले. त्याला बाद करण्याची आयती संधी चेन्नईने मोक्याच्या क्षणी गमावली. त्यानंतर दिल्लीच्या संघाला सामना जिंकण्यासाठी 18 चेंडूंत 28 धावा हव्या होत्या. त्या वेळी धोनीने चॅम्पियन डिजे ब्रावोच्या हाती चेंडू सोपवला. ब्रावोने आपल्या पहिल्या षटकाची सुरुवात वाइड चेंडू टाकून अवांतर धाव देत केली. या षटकातील त्याच्या दुसर्‍या चेंडूवर हेटमारयने खणखणीत चौकार खेचला. मग ब्रावो पुन्हा विस्कटला आणि त्याने आणखी एक चेंडू वाइड टाकला, पण या षटकातील तिसर्‍या चेंडूवर हेटमायरने पुन्हा एकदा मोठा फटका खेळला. या वेळी चेंडू फिल्डरपर्यंत पोहचला, मात्र बारावा खेळाडू म्हणून क्षेत्ररक्षणासाठी मैदानात उतरलेल्या कृष्णाप्पा गौतमने हातात आलेला झेल सोडला. हाच मॅचचा टर्निंग पॉइंट ठरला. ब्रावोच्या या षटकात दिल्लीच्या खात्यात 12 धावा आल्या. कॅच सुटला त्या वेळी हेटमायर अवघ्या 12 धावांवर खेळत होता. त्याने या सामन्यात मॅच विनिंग खेळी केली. तो 18 चेंडूंत 28 धावा करून नाबाद राहिला. दिल्लीकडून 18 धावांत 2 बळी घेणार्‍या अक्षर पटेलला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले. चेन्नईविरुद्धच्या विजयासह दिल्लीच्या खात्यात आता 20 गुण झाले आहेत.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply