इपोह : वृत्तसंस्था
भारतीय पुरुष हॉकी संघाने वर्ल्डकप स्पर्धेतील निराशाजनक कामगिरीचा इतिहास मागे सोडून नव्या दमाने सुरुवात केली आहे. त्यांनी सुलतान अझलान शाह चषक हॉकी स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात आशियाई स्पर्धेतील विजेत्या जपानवर 2-0 असा विजय मिळवला.
वरुण कुमारने 24व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवर गोल करताना भारताला आघाडी मिळवून दिली आणि त्यात सिमरनजीत सिंगने (55 मि.) मैदानी गोल करून भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
भारताला पुढील साखळी सामन्यात कोरियाचा सामना करावा लागणार आहे. त्यानंतर मलेशिया (दि. 26), कॅनडा (दि. 27) आणि पोलंड (दि. 29) यांच्याशी भारतीय संघ भिडेल. गटातील अव्वल दोन संघ पुढील फेरीत खेळतील.