अकोला ः प्रतिनिधी
अकोला जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांच्या गावात राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या प्रहार पक्षाने राष्ट्रवादीचा पराभव केला आहे. यावरून मिटकरी आणि कडू यांच्यात वाद पेटला आहे. गावातील पराभव मिटकरींच्या जिव्हारी लागला आहे. याबाबत एका वृत्तवाहिनीशी बोलताना ते म्हणाले, सर्वच पक्षांनी पोटनिवडणुकीच्या माध्यमातून आत्मचिंतन करावे. कुरघोडीचे राजकारण करू नये. महाविकास आघाडी एकत्र आली नाही तर महापालिकेच्या निवडणुकांमध्ये अपयश येऊ शकते हे सर्वांनी लक्षात ठेवावे. बच्चू कडू हे शेतकरी नेते आहेत. त्यांनी भाजपसोबत आतून आघाडी केली. मग ते महाविकास आघाडीचे मंत्री असताना त्यांनी असे का केले? यानंतर राज्यमंत्री कडू यांनी आमदार मिटकरींवर जोरदार प्रहार केला. मिटकरी हा मोठा माणूस आहे. मी त्याच्याबाबत बोलू शकत नाही. मी आमिषाला बळी पडणारी औलाद नाही. ही माझी संस्कृती नाही. असे काही असेल तर मिटकरींनी सिद्ध करावे. हवेत आरोप कोणीही करू शकतात. मिटकरी हे बरोबर नाही. हे मी सहन नाही करणार. चुलीत गेले ते मंत्रिपद. आमिषाला बळी पडणे म्हणजे काय असते ते मला आधी सांगा. राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप सर्वच पक्ष वेगवेगळे लढले आहेत. मी कुठल्या आमिषाला बळी पडलो ते सिद्ध करा. मी उद्या राजीनामा देऊन फेकतो. मला त्याची गरज नाही, असे बच्चू कडू म्हणाले.
जि. प. पोटनिवडणुकीतही भाजप अव्वल -चंद्रकांत पाटील
मुंबई : राज्यातील सहा जिल्हा परिषदा आणि 38 पंचायत समित्यांमधील रिक्त पदांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपला राज्यातील प्रमुख राजकीय पक्षांमध्ये सर्वाधिक जागा मिळाल्या असून त्याबद्दल आपण मतदारांचे आभार मानतो आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांचे अभिनंदन करतो, अशी प्रतिक्रिया भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी (दि. 6) व्यक्त केली. चंद्रकांत पाटील म्हणाले की, या निवडणुकीत राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीच्या शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस या घटक पक्षांनी सत्तेचा पुरेपूर वापर केला तरीही मतदारांनी भाजपाला पहिली पसंती दिली आहे. 2014 ते 2019 या कालावधीत राज्यात सत्तेवर असताना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात भाजपा पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरला होता व भाजप विरोधी पक्ष असला तरीही तोच ट्रेंड आज कायम राहिला आहे.