Breaking News

जनतेचे अभिनंदन व आभार!

महाभयंकर कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या जनता कर्फ्यूच्या आवाहनाला सुमारे 130 कोटी लोकांनी बंद पाळून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. खरंतर यातून देशवासीयांचेच जीवन सुरक्षित होणार आहे. तरीही देशाच्या दृष्टीने आवश्यक असलेली बाब कटाक्षाने पाळून भारतीयांनी संपूर्ण जगाला नवा आदर्श घालून दिला आहे.

चीनमधून पसरलेला कोरोना आता इतर देशांत आपला प्रकोप दाखवू लागला आहे. जगभरातील अनेक देशांमध्ये कोरोनाने आपली दहशत माजवली आहे. युरोपातील प्रगत देशांपैकी एक असलेल्या इटलीत तर कोरोनाने अशरक्ष: मृत्यूचे तांडव केले आहे. इटलीत एकाच दिवशी 800 जणांच्या मृत्यूने जग सुन्न झाले आहे. या देशात आतापर्यंत 53 हजार 578 जणांना कोरोनाची लागण झाली आहे, तर मृतांचा आकडा 4825वर गेला आहे. इटलीतील स्थिती चीनपेक्षा खराब झाली आहे. हा देश पूर्णपणे लॉकडाऊन झालाय. परिस्थिती एवढी भीषण झाली आहे की कोरोनाने मृत्यू झालेल्या लोकांचे मृतदेह प्रार्थनास्थळ असलेल्या चर्चमध्ये ठेवण्याची वेळ आली आहे. तेथे कोरोनाविषयी वेळीच काळजी न घेतली गेल्याने ही परिस्थिती ओढावल्याचे म्हटले जाते. म्हणूनच भारतवासीयांनो सावधान! आपल्या देशातही सुरुवातीला कमी असलेला कोरोनाबाधितांचा आकडा हळूहळू वाढत चालला आहे. सुदैवाने आपले सरकार सजग असून, देशातील नागरिकांची काळजी घेत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकराने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक निर्णय घेतले असून, सर्व राज्य सरकारांनाही विविध निर्देश दिले आहेत. त्यानुसार सरकारी यंत्रणा कामाला लागली आहे. एकीकडे आरोग्य क्षेत्रातील मंडळी कोरोनाचा रात्रंदिवस मुकाबला करीत असताना दुसरीकडे प्रशासकीय आणि पोलीस अधिकारी, कर्मचारीही आपापल्या सेवेत नेटाने कार्यरत आहेत. त्यांना सहकार्य करणे नागरिकांच्या हिताचे आहे. पंतप्रधानांनी आवाहन केल्यानुसार रविवारी समस्त देशवासीयांनी जनता कर्फ्यू पाळून शंभर टक्के बंद पाळला. त्यासाठी सर्वांचे अभिनंदन आणि आभार, पण यापुढेही काळजी घेणे आवश्यक आहे. आवश्यकता असेल तरच नागरिकांनी घराबाहेर पडावे. मुख्य म्हणजे स्वच्छता राखणे आता अनिवार्य बनले आहे. खरंतर केवळ कोरोनाचा संसर्ग आहे म्हणून स्वच्छतेविषयी सजग न राहता दैनंदिन जीवनातही साफसफाईकडे लक्ष दिल्यास रोगराई पसरण्यास प्रतिबंध होऊ शकतो. अनेक रोग, आजार, व्याधी स्वच्छतेअभावी होत असतात. संसर्गजन्य विषाणूचा फैलाव रोखण्यातही स्वच्छतेचा मोठा हातभार लागतो. येणारे काही दिवस महत्त्वाचे आहेत. कारण आपण कोरोनाच्या तिसर्‍या टप्प्यात आलो आहोत. त्यामुळे हा कालावधी गांभीर्याने घेण्याचा आहे. देशात कोरोनाबाधितांची संख्या सव्वातीनशेच्या वर गेली आहे, तर बळींचा आकडा पाच झाला आहे. तरीही अजूनही काही लोक कोरोनाविषयी गंभीर नाहीत. आपल्याला काही होत नाही असे म्हणून आता चालणार नाही. कोरोनाचा विषाणू संसर्गजन्य आहे आणि तो कुठूनही व कसाही पसरतो. त्यामुळे धोका जास्त आहे. ते लक्षात घेता देशाचे सुजाण नागरिक म्हणून स्वत: यापासून सुरक्षित राहून इतरांनाही सुरक्षित ठेवणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. आपल्या देशाने यापूर्वीही अनेक संकटांवर मात केली. सरकारी सूचना, नियम, मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करून कोरोनारूपी संकटही आपण परतवून लावू. फक्त त्यासाठी गरज आहे ती इच्छाक्तीची!

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply