उरण : प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणमार्फत उरण तालुका विधी सेवा समितीतर्फे कायदेविषयक जनजागृती करण्यासाठी सोमवारी (दि. 4) उरण नगर परिषद कार्यालयात कायदेविषयक जनजागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या शिबिरामध्ये उरण न्यायालयातील सहदिवाणी न्यायाधीश राहुल बी. पोळ, नगराध्यक्ष सायली म्हात्रे, अनिल जगधनी, तसेच अॅड. पराग म्हात्रे, अॅड. व्ही. एल. पाटील, अॅड. किशोर ठाकूर, अॅड. तेजस्विनी कोळी, उरण न्यायालयातील विधिज्ञ, न्यायालयीन कर्मचारी, नगर परिषद कर्मचारी व नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. अॅड. पराग म्हात्रे यांनी शिबिराचे सूत्रसंचालन करून उपस्थितांना कायदेविषयक मार्गदर्शन केले. अॅड. व्ही. एल. पाटील यांनी महिलांसाठी कायद्यामधील तरतुदींबाबत महिती दिली.
अॅड. किशोर ठाकूर यांनी गर्भधारणापूर्व व प्रसूतीपूर्व निदान तंत्र निवडीस प्रतिबंध कायदा 1994 याबाबत मोलाचे मार्गदर्शन केले. अॅड. तेजस्विनी कोळी यांनी लोकअदालतबाबत माहिती देऊन मार्गदर्शन केले. अध्यक्षीय भाषणात सहदिवाणी न्यायाधीश राहुल बी. पोळ यांनी नालसा अंतर्गत येणार्या विविध योजनांचे महत्त्व पटवून दिले. उरण तालुका विधी सेवा समितीमार्फत कायदेविषयक जनजागृती करत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यात आला.