खालापूर : प्रतिनिधी
मागील चार दिवस पावसाने घुमशान घातले असून बुधवारी (दि. 13) गुरुपौर्णिमेच्या दिवशी सतत मुसळधार पाऊस कोसळत असल्याने खालापूर, खोपोली, रसायनी, मोहपाडा, चौक, वावोशी परिसरातील नद्या व नाले तुडुंब भरून वाहत आहेत. तर काही मार्ग पाण्याखाली गेले आहेत. खोपोली-पाली मार्गावरील पुलावरून पाणी गेले तर काही ठिकाणी मार्गाच पाण्याखाली गेल्याने हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.
अंबा नदी पुलावरून पाणी वाहत असल्याने गेल्या दोन दिवसापासून तुकसाई गावाचा संपर्क तुटला आहे. मोहपाडा येथील रस्ता खचला असल्याने खबरदारी घेतली जात आहे. तर झाड पडल्याने खोपोलीतील मिल गावाकडे जाणारा रस्ता बंद झाला आहे.
दरम्यान, खालापूर तहसीलदार आयुब तांबोळी खोपोली नगर परिषदेचे मुख्याधिकारी अनूप दुरे यांच्यासह पोलीस अधिकारी, सामाजिक कार्यकर्ते यांनी खोपोली परिसरातील काटरंग, भानवज, विणानगर, क्रांतीनगर येथील नाल्यांची पाहणी केली तर झेनीथ धबधबा येथे जाऊन परिस्थिती जाणून घेतली.
हवामान खात्याने बुधवार व गुरुवारी जोरदार पर्जन्यवृष्टी होण्याचा इशारा दिला असल्याने शाळांना दोन दिवस सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. नागरिकांनी अनावश्यक घराबाहेर पडू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.