उरण : वार्ताहर
लोकसभा निवडणुकीच्या पाश्वर्भूमीवर निवडणूक आयोगाच्या अधिपत्याखालील स्थिर पथकाकडून ठिकठिकाणी वाहनांची तपासणी करण्यात येत आहे. उरणमध्येही आचारसंहितेची सुयोग्य अंमलबजावणी व्हावी या उद्देशाने मोक्याच्या जागी वाहनांची तपासणी केली जात आहे.
मोरा कोळीवाडा, बोकडविरा येथील शेवा चारफाटा, खारपाडा चेकपोस्ट, उलवा, शेडुंग यादी ठिकाणी चेकपोस्ट ठेवण्यात आले आहेत. एकूण 10 पथके दिवसा पाच व रात्री पाच याप्रमाणे कार्यरत आहेत. प्रत्येक पथकात पाच व्यक्तिंचा समावेश असून, यात एक पथक प्रमुख, एक सहाय्यक कर्मचारी, दोन पोलीस व एक व्हिडीओग्राफर (कॅमेरामन) यांचा समावेश आहे. सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. दीपा भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली आचारसंहिता अंमलबजावणीसाठी नोडल अधिकारी उरण नगर परिषदेचे मुख्याधिकारी काम पाहात आहेत. प्रभावी अंमलबजावणी करून आतापर्यंत आचारसंहिता भंग करणार्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.