पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल परिसरामध्ये सायबर गुन्हेगारीच्या प्रमाणात वाढ झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून पनवेल परिसरातील पोलीस ठाण्यात अनेक सायबर गुन्ह्यांची नोंद झाली असून या गुन्ह्यांची उकल करणे पोलिसांना आव्हान आहे. शहर आणि ग्रामीण भागातली इंटरनेट, ईमेल, विविध अॅप वापरकर्त्यांमधील दरी कमी होत आहे. वाढत्या वापराबरोबरच सायबर गुन्हेगारीही वाढल्याचे निदर्शनास येत आहे.
क्रेडिट कार्डवर जमा झालेल्या रिवॉर्ड पॉइंटचा वापर करण्याच्या बहाण्याने एका सायबरचोराने पनवेलमध्ये राहणार्या व्यक्तीला अॅपवर क्रेडिट कार्डची सर्व माहिती भरण्यास सांगून त्याद्वारे त्यांच्या खात्यातून पावणे दोन लाख रुपये उकळल्याची घटना उघडकीस आली. पनवेल शहर पोलिसांनी या सायबरचोराविरोधात गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला आहे.
या प्रकरणात फसवणूक झालेले गौतम सुबोध घटक (60) हे पनवेलच्या तक्का भागात कुटुंबासह राहण्यास असून 8 सप्टेंबर रोजी दुपारी त्यांना एका अज्ञात सायबर चोराने अॅक्सिस बँकेच्या क्रेडिट कार्ड विभागातून बोलत असल्याचे सांगून संपर्क साधला होता. तसेच त्याने गौतम यांच्या क्रेडिट कार्डवर रिवॉर्ड पाँइंट जमा झाल्याचे सांगितले. गौतम यांनी त्याबाबत अधिक चौकशी केल्यानंतर सायबरचोराने त्यांना क्रेडिट कार्डची माहिती एका अॅपवर भरण्यास सांगितली. त्यानुसार गौतम यांनी सर्व माहिती भरल्यानंतर काही वेळातच क्रेडिट कार्डवरून तीन व्यवहार झाल्याचे व त्यातून सुमारे पावणे दोन लाख रुपये दुसर्या खात्यात वळते झाल्याचे मेसेज गौतम यांच्या मोबाइलवर आले. त्यानंतर आपली फसवणूक होत असल्याचे लक्षात आल्यानंतर गौतम यांनी कस्टमर केअरला संपर्क साधून क्रेडिट कार्ड ब्लॉक केले. त्यानंतर त्यांनी पनवेल शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.
केवायसी अपडेटच्या बहाण्याने फसवणूक
पनवेल : वार्ताहर
गेल्या काही दिवसांपासून केवायसी अपडेटच्या नावाखाली फसवणूक होण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. खांदेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अशीच घटना घडली आहे.
सायबर ठगाने केवायसी अपडेटच्या नावाखाली ऑनलाइन टीम व्हिवर क्विक सपोर्ट आणि अॅनीडेस्क रिमोट डेस्कटॉप सॉफ्टवेअर अशी दोन अॅप मोबाईलमध्ये डाउनलोड करण्यास सांगितले. त्या माध्यमातून 3,31,743 रुपयांच्या रक्कमेची फसवणुक करीत बँक खात्यावर डल्ला मारला आहे. याबाबत खांदेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फसवणुकीसाठी सायबर चोरटे नवनवीन क्लुप्त्या लढवत असतात. सध्या मोबाइल केवायसी अपडेटच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात फसवणूक होत असल्याचे समोर येत आहे. अशीच घटना खांदेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये घडली आहे. पनवेल तालुक्यातील चिपळे गाव येथे राहणार्या एका 65 वर्षीय नेव्ही मधुन सेवानिवृत्त झालेल्या व्यक्तीची फसवणूक झालेली आहे. भामट्याने त्या व्यक्तीची एकूण 3,31,743 रुपयांची फसवणूक केली. तक्रारदाराने फोन केला असता त्या भामट्याने आपले नाव राहुल शर्मा असल्याचे सांगितले व फोन कट केला आणि पुन्हा फोन लागलाच नाही. या वेळी तक्रारदाराला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी खांदेश्वर पोलीस ठाणे गाठत फसवणुकीबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक तपास पोलीस करीत आहेत.
कर्ज मिळवून देतो सांगून फसवणूक
पनवेल : वार्ताहर
उद्योग कर्ज मंजूर करण्याचे आमिष दाखवून कर्ज न देता 98 हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार नवीन पनवेल येथे उघडकीस आला आहे. अज्ञात आरोपीविरोधात खांदेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नवीन पनवेल, सेक्टर 19 येथील प्रेरणा वसंत रणखांबे यांचा हॉटेल व्यवसायिकांना बॅग, कंटेनर पुरवठा करण्याचा व्यवसाय आहे. या वेळी सौरभ भोनकर यांनी त्यांना फायनान्स कंपनीतून कर्ज मिळवून देतो असे सांगितले. स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेतून 60 लाख रुपयांचे कर्ज मंजूर करून देतो असे सांगून त्यांच्याकडून 10 हजार रुपये घेतले. त्यानंतर सौरव याने कर्ज मंजूर करण्याचे काम हा त्याचा मित्र प्रेमशील साळवी करून देईल असे सांगितले. त्यानंतर प्रेमशील साळवी याने कर्ज मंजूर करण्याकरता 88 हजार रुपये रणखांबे यांच्याकडून घेतले, मात्र कर्ज मंजूर केले नाही. कर्ज मिळवून देण्याच्या बहाण्याने रणखांबे यांच्याकडून दोघांनी 98 हजार रुपये घेऊन त्यांना कर्ज दिले नाही व त्यांची फसवणूक केली. या प्रकरणी सौरभ भोनकर व प्रेमशील साळवी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.