Breaking News

वाचनसंस्कृती टिकायला हवी

एकही पुस्तक वाचलेले नाही असे सांगणारे विद्यार्थी मोठ्या संख्येने आढळतात. मुलांमध्ये वाचनाची सवय कायम राहावी म्हणून सरकारी पातळीवरून शिक्षण विभागामार्फत प्रयत्न जारी आहेत, परंतु मोबाईल आणि टीव्हीचा विळखा मुलांना पुस्तकांपासून दूर नेतो आहे. खरे तर, लहानपणापासून वाचनाची गोडी लागलेल्या मुलांची शब्दसंपदा तर समृद्ध आढळून येतेच, खेरीज ही मुले अधिक प्रतिभासंपन्न आणि निर्मितीक्षम असल्याचेही दिसते.

एप्रिल 23 हा दिवस जगभरात ‘पुस्तक दिन’ म्हणून साजरा केला जातो. महाराष्ट्र तूर्तास निवडणुकीच्या धामधुमीत बुडाला आहे म्हणून अन्यथा ‘भिलार’ हे देशातील पहिलेवहिले ‘पुस्तकांचे गाव’ उभारणार्‍या महाराष्ट्रात पुस्तक दिनानिमित्ताने कार्यक्रमांची रेलचेल समोर आली असती. वाचनाला उत्तेजन देणार्‍या अशा कार्यक्रमांची गरज आज महाराष्ट्रालाच नव्हे, तर अवघ्या देशाला आणि जगभरातही जाणवते आहे. गेल्या दशकभरात सगळीकडेच छापील पुस्तकांच्या विक्रीचे आकडे सातत्याने खाली गडगडले आहेत. अगदी अमेरिकेसारखा बलाढ्य देशही याला अपवाद नाही. पुस्तकविक्रीचे प्रमाण दिवसेंदिवस रोडावत असताना वाचनाच्या सवयीबाबत मात्र काही जण उलटा दावाही करतात. प्रकाशन व्यवसायाच्या संदर्भातही आशादायी चित्र रंगवतात. विशेषत: आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या बलाढ्य प्रकाशन संस्था ज्या तर्‍हेने भारतीय बाजारपेठेवर लक्ष ठेवून आहेत त्यावरून हा दावा केला जातो. वाचकांचे प्रमाण कमी झालेले नाही, निव्वळ छापील पुस्तकांकडून ते ई-पुस्तकांकडे वळले आहे असे सांगितले जाते, परंतु गावोगावची छोटेखानी वाचनालये ओसाड पडू लागली आहेत हे एक वास्तव उरतेच. पुस्तके विकत घेऊन वाचणार्‍यांची संख्या आपल्याकडे कायमच कमी होती. वाचनालयांतून पुस्तके आणून वाचणारेच मोठ्या संख्येने होते, परंतु आता इंटरनेट आणि समाजमाध्यमे या डिजिटल व्यासपीठांमुळे पुस्तके वाचण्याचे प्रमाण झपाट्याने खाली चालले आहे का, हा गांभीर्याने विचार करण्याचा विषय आहे. सर्वसाधारण शाळा-कॉलेजांमध्ये हा बदल विशेषत्वाने जाणवतो. मुलांमध्ये ही वाचनाची गोडी काही उपजत नसते. पालकांना ती सवय प्रयत्नपूर्वक लावावी लागते. ज्यांचे पालक मुलांना लहानपणी पुस्तके वाचून दाखवतात, ती मुले बहुधा पुढेही थोड्याफार प्रमाणात उत्तम वाचन करीत राहतात. अर्थात, मुले मोठ्यांच्या सूचनांवरून सवयी उचलण्यापेक्षा त्यांच्या अनुकरणातून अधिक गोष्टी आत्मसात करीत असतात. त्यामुळेच ज्या घरात मोठी माणसे मुलांना वाचन करताना दिसतात, त्याच घरांतील मुलांमध्ये वाचनाची सवय विकसित होताना आढळते, पण आज बहुतांश मुले ही मोबाईलवर कार्टून्स पाहणे वा गेम खेळणे यामध्येच गुंग झालेली दिसतात, तर मोठी माणसे ही व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुकसारख्या  समाजमाध्यमांमध्ये अडकलेली. समाजमाध्यमांवरील साराच मजकूर टाकावू असतो असे नाही, परंतु पुस्तकवाचनातून एखाद्या विषयाच्या खोलात शिरणे जसे घडते तितके व तसेे समाजमाध्यमांवरील पोष्टींवरून निश्चितच साध्य होणार नाही. किंडलसारख्या आधुनिक माध्यमांवरही आता मराठी पुस्तके उपलब्ध होऊ लागली आहेत, परंतु अद्याप सर्वसामान्य मराठी वाचकांच्या आवाक्यात ही माध्यमे निश्चितच नाहीत. आजच्या धकाधकीच्या जगण्यात अनेकदा हवाहवासा वाटणारा विरंगुळा आणि विसावा पुस्तके निश्चितच देऊ शकतात. याउलट समाजमाध्यमे ही आपल्यावरील ताणात भर घालत असतात, हा फरक सगळ्यांनीच ध्यानात घेण्याची गरज आहे.

Check Also

जाहीर धुव्वा

विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन शुक्रवारी संपले. या संपूर्ण अधिवेशनाच्या काळात विरोधी पक्षाचे नेते पूर्णत: निष्प्रभ झालेले …

Leave a Reply