आमदार प्रशांत ठाकूर यांचा ट्वीटद्वारे हल्लाबोल
पनवेल : रामप्रहर वृत्त
एसटी कर्मचार्यांच्या प्रश्नांवर आघाडी सरकारची भूमिका राज्याला भूषणावह नाही. या सरकारने फक्त स्वार्थी आणि निष्क्रिय कारभार केला आहे. त्यामुळे एसटी कर्मचार्यांसह प्रवाशांचे नाहक हाल करण्याचे काम महाविकास आघाडी सरकारने सुरू ठेवत आपली मनमानी केली आहे, त्यामुळे महाविकास आघाडी हे मनमानी आघाडी सरकार आहे, अशी टीका भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी ट्वीटद्वारे केली आहे.
महात्माजी गांधी के तीन बंदर या युक्तीत वाईट बघू नका, वाईट ऐकू नका, वाईट बोलू नका असे आहे, मात्र महाविकास आघाडीमध्ये उलट आहे. हे सरकार राज्यातील प्रश्नांबाबत काही बघत नाही, ऐकत नाही, बोलत नाही ही भूमिका अत्यंत चुकीची असून पुरोगामी महाराष्ट्राला शोभनीय नाही. एसटी कर्मचार्यांचे कष्ट हे खूप मोठ्या प्रमाणात असते, कर्मचारी म्हणून ते काम करीत असताना त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते अशा परिस्थितीत त्यांना न्याय मिळणे अपेक्षित असताना महाविकास आघाडी जाणूनबुजून याकडे दुर्लक्ष करीत आहे.
ठाकरे सरकार सर्व आघाड्यांवर अपयशी ठरले. त्याचप्रमाणे एसटी कर्मचारी आणि प्रवाशांच्या बाबतीतही तेच घडले आहे. ठाकरे सरकारच्या निष्क्रिय कारभामुळे सर्व जनता चिंतीत झाली आहे. या काळात एसटी कमर्चारी आत्महत्या करू लागला आहे आणि त्याच्या कुटुंबाचा मोठा आधार हरपला जात असताना राज्य सरकार मात्र फक्त बघ्याची भूमिका घेत आहे. त्यामुळे राज्यातील समस्यांबाबत काही बघायचे नाही, ऐकायचे नाही व त्यावर काही बोलायचे नाही आणि या सर्वातून राज्यातील जनतेचे प्रश्न रेंगाळत ठेवायचे, फक्त सत्ता आणि सत्ता ही कर्मनीती महाविकास आघाडीची असून या तिघाडी सरकारचा निषेध करू तेवढा कमी आहे, असे आमदार प्रशांत ठाकूर यांनी अधोरेखित केले आहे.
मुंडन करून केला निषेध
पुणे : राज्यात एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरणाच्या मागणीसाठी कर्मचार्यांनी संप पुकारला आहे. वेगवेगळ्या शहरात कर्मचार्यांचे आंदोलन सुरू आहे. पुण्यातील स्वारगेट आणि शिवाजीनगर बस स्थानकात एसटी कर्मचार्यांचे सलग चौथ्या दिवशी आंदोलन सुरू ठेवले आहे. आज आंदोलनाच्या चौथ्या दिवशी संपात सहभागी झालेल्या कर्मचार्यांनी मुंडन करून महामंडळ व राज्य शासनाचा निषेध केला.
एसटी कर्मचार्याचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
सांगली : राज्यात सर्वत्र एसटी कर्मचार्यांचे आंदोलन सुरू आहे, उपोषण सुरू आहे. याला कुठेतरी गालबोट लागल्याचे समोर आले आहे. सांगलीमध्ये संपकरी एसटी कर्मचार्याचे निधन झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. राहत्या घरी हृदयविकाराच्या झटक्याने एसटी कर्मचार्यांचे निधन झाले. आज सकाळी ही घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, राजेंद्र निवृत्ती पाटील (वय 46, रा. कवलापूर) असे या एसटी कर्मचार्याचे नाव आहे. एसटी संपाच्या विवंचनेतून ही घटना घडल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. मृत पाटील यांच्या मृतदेहावर कवलापूर या मूळगावी अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. या घटनेने राज्य सरकारच्या विरोधात एसटी कर्मचार्यांमध्ये संतापाची भावना आहे.