Breaking News

अलिबागेत अल्पवयीन मुलीला देहविक्रीला लावण्याचा प्रयत्न; फार्महाऊस मालक, महिलांसह चौघांना अटक

अलिबाग : प्रतिनिधी
घरातून पळालेल्या अल्पवयीन मुलीला काम देण्याच्या बहाण्याने देहविक्रीच्या नरकात ढकलण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार अलिबाग तालुक्यात उघडकीस आला आहे, मात्र या मुलीने अत्यंत हुशारीने या नराधमांच्या तावडीतून पळ काढत मांडवा सागरी पोलीस ठाणे गाठले आणि स्वतःची सुटका करून घेतली. या प्रकरणी दोन महिला व एका फार्महाऊस मालकासह चौघांना अटक करण्यात आली आहे. पीडित मुलगी (वय 16) मूळची अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी येथील आहे. दोन महिन्यांपूर्वी ती क्षुल्लक कारणावरून घर सोडून पुण्यात आली. तेथून ती चेन्नई, गोवा, बेळगाव असा प्रवास करत पनवेल येथे पोहचली. तिची पर्स चोरीला गेल्याने ती दिवसभर पनवेल बसस्थानकातच बसून होती. या वेळी नागोठण्यातील हुजरा मोहल्ला येथील दोन महिलांची तिच्यावर नजर पडली. त्यांनी काम देण्याचे आश्वासन देत तिला पनवेल येथील एका लॉजवर ठेवले. त्यानंतर करंजा येथून बोटीने रेवस येथे आणले व आपल्या मुलाच्या ताब्यात दिले. या मुलाने मोटरसायकलवरून पीडित मुलीला सासवणे (ता. अलिबाग) येथील किशोर फार्महाऊसवर आणले. तेथे त्या मुलाने काही ग्राहकांना बोलावून या मुलीला त्यांच्यासोबत शारीरिक संबंध ठेवण्यास सांगितले. तिने यासाठी विरोध केला. त्यामुळे तिला धमकावण्यात आले. परिणामी पीडित मुलीने नाईलाजास्तव तयारी दाखवली. घडल्या प्रकाराने मुलगी हादरली होती, मात्र त्याही परिस्थितीत तिने प्रसंगावधान राखत तेथून पळ काढला आणि काही ग्रामस्थांच्या मदतीने मांडवा पोलीस ठाणे गाठले. या प्रकरणी उपविभागीय पोलीस अधिकारी सोनाली कदम यांनी फार्महाऊस मालकासह दोन महिला व तिच्या मुलाला अटक केली तसेच पीडितेच्या घरी संपर्क साधून याबाबत कल्पना दिली. आरोपींना अलिबाग न्यायालयात हजर केले असता, पाच दिवस पोलीस कोठडीचे आदेश देण्यात आले. या घटनेचा अधिक तपास सुरू आहे.

Check Also

भारतमाता चित्रपटगृहाशी माझं नातं अगदी वेगळं…

भारतमाता चित्रपटगृहाने छान कात टाकली. ते आजचं झाले.बदल हा होतच असतो, तो व्हायलाही हवा. काही …

Leave a Reply