माले ः वृत्तसंस्था
भारतीय संघाने दबदबा कायम राखताना तब्बल आठव्यांदा ‘सॅफ’ अजिंक्यपद फुटबॉल स्पर्धेच्या चषकावर आपली मोहोर उमटवली. अंतिम सामन्यात भारताने नेपाळवर 3-0 अशी मात करीत मुख्य प्रशिक्षक इगोर स्टिमॅच यांच्या मार्गदर्शनात पहिलेच जेतेपद पटकावले. नेपाळविरुद्धचे मागील तीनपैकी दोन सामने जिंकण्यात भारताला यश आले होते. त्यामुळे अंतिम सामन्यात भारताचे पारडे जड मानले जात होते आणि या संघाने सुरुवातीपासूनच वर्चस्व प्रस्थापित केले. चौथ्या मिनिटाला मोहम्मद यासिर व अनिरुद्ध थापा यांनी मारलेले सलग दोन फटके नेपाळचा गोलरक्षक किरण कुमार लिंबूने अडवले. यानंतर 27व्या मिनिटाला कर्णधार सुनील छेत्रीचा गोल मारण्याचा प्रयत्न अपयशी ठरला तसेच नेपाळचा गोलरक्षक किरणनेही आणखी काही फटके अडवल्याने मध्यंतराला गोलशून्य बरोबरी होती. उत्तरार्धात भारताच्या आक्रमणाला अधिक धार आली. 49व्या मिनिटाला छेत्रीने गोल करीत भारताला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली, तर पुढच्याच मिनिटाला सुरेश सिंहच्या गोलमुळे भारताची आघाडी दुप्पट झाली. यानंतर पिछाडीवर पडलेल्या नेपाळने आक्रमक खेळ करण्याचा प्रयत्न केला, मात्र भारताने प्रतिहल्ला सुरू ठेवत नेपाळच्या बचावफळीवर दडपण टाकले. अखेर 90 मिनिटांनंतरच्या भरपाई वेळेत सहाल अब्दुल समदने गोल करीत भारताला हा सामना 3-0 असा जिंकवून दिला आणि सर्व खेळाडूंनी एकच जल्लोष केला.
वर्चस्व अबाधित
भारताने ‘सॅफ’ अजिंक्यपद फुटबॉल स्पर्धेतील वर्चस्व अबाधित राखताना यंदा तब्बल आठव्यांदा जेतेपद पटकावले. आशिया खंडातील ही स्पर्धा सर्वाधिक वेळा जिंकणार्या संघांच्या यादीत मालदीवचा दुसरा क्रमांक असून त्यांनी दोनदा विजेतेपद मिळवले. भारताने 1993, 1997, 1999, 2005, 2009, 2011, 2015 आणि 2021मध्ये ही स्पर्धा जिंकली तसेच भारतीय संघ चार वेळा या स्पर्धेचा उपविजेता होता.
सुनील छेत्रीची लिओनेल मेस्सीशी बरोबरी
कर्णधार छेत्रीने नेपाळविरुद्धच्या अंतिम सामन्यात भारताचे गोलचे खाते उघडले. हा त्याचा यंदाच्या स्पर्धेतील पाचवा गोल ठरला. त्यामुळे त्याने अर्जेटिनाचा आघाडीचा खेळाडू लिओनेल मेस्सीच्या (80) आंतरराष्ट्रीय गोलसंख्येशी बरोबरी केली. 37 वर्षीय छेत्रीने भारताकडून 125 सामन्यांत 80 गोल केले आहेत तसेच या वर्षांत त्याने उत्कृष्ट कामगिरी करताना 10 सामन्यांत आठ गोल झळकावले आहेत.