भाजप ट्रान्सपोर्ट सेलची मागणी; वाहतूक पोलिसांना निवेदन
उरण : रामप्रहर वृत्त
जासई ते गव्हाण टाकी व वीरगो यार्ड ते पागोटे उड्डाण पूल (एनएच-4बी) या रस्त्याच्या दुतर्फा अनेक गाड्या अवैधपणे पार्किंग केलेल्या असतात. या गाड्यांवर कारवाई करावी, अशी मागणी भाजप ट्रान्सपोर्ट सेलचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष सुधीर घरत यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी कळंबोली उप-प्रादेशिक वाहतूक अधिकारी, उरण वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, बेलापूर वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना निवेदन दिले आहे.
सुधीर घरत यांनी निवेदनात म्हटले की, जासई ते गव्हाण टाकी व वीरगो यार्ड ते पागोटे उड्डाण पूल (एनएच-4बी) या रस्त्याच्या दुतर्फा अवैधपणे अनेक गाड्या पार्किंग केलेल्या असतात. या अवैधपणे उभ्या केलेल्या गाड्यांमुळे वाहतुकीस कायम अडथळा निर्माण होत आहे. या पार्किंग केलेल्या गाड्यांमुळे अनेक लहान-मोठे अपघातदेखील घडलेले आहेत. अपघातात अनेकजण जखमी झाले, अनेकांना कायमस्वरूपी अपंगत्व तर काहींना आपला जीव गमवावा लागला आहे. जासई ते गव्हाण टाकी रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम चालू आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात येणार्या -जाणार्या गाड्यांना वाहतूक कोंडीमध्ये अडकावे लागते. वाहतूक कोंडीमुळे कामाचे अनेक तास वाया जातात व वेळेवर पोहचणेदेखील शक्य होत नाही. इंधनाचादेखील अपव्यय होत आहे. तशातच या रस्त्याच्या दुतर्फा अवैधपणे अनेक गाड्या पार्किंग केल्याने वाहतूक कोंडीमोठ्या प्रमाणात निर्माण होत आहे.
जासई ते गव्हाण टाकी व एनएच-4बी या रस्त्याच्या दुतर्फा अनेक कंटेनर यार्ड आहेत. या यार्डमध्ये येणार्या व जाणार्या गाड्या बिनधास्तपणे अनेक तासनतास रस्त्यावर उभ्या केलेल्या असतात. या रस्त्यावर अवैधपणे पार्किंग केलेल्या गाड्यांमुळे अपघात होत आहेत व वाहतूककोंडीदेखील होत आहे. जनसामान्यांमध्ये याबाबत अतिशय नाराजी आहे. भाजप ट्रान्सपोर्ट सेल कडे याबाबत अनेकांनी नाराजी व्यक्ती केली आहे. सोशल मीडियावर देखील अनेक तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. जनसामान्यांच्या भावनांचा विस्फोट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे रस्त्याच्या दुतर्फा अनेक गाड्या अवैधपणे पार्किंग केलेल्या असतातया गाड्यांवर कारवाई करावी.