Breaking News

न्हावाशेवा टप्पा क्रमांक 3 पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्यासाठी तातडीने कार्यवाही करा

आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी यांची मागणी
– योजना विहीत मुदतीत पूर्ण करण्यासाठी प्राधिकरणाच्या स्तरावरून आवश्यक पाठपुरावा -मंत्री गुलाबराव पाटील

मुंबई ः रामप्रहर वृत्त
पनवेल तालुक्यातील न्हावाशेवा टप्पा क्रमांक 3 पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्यासंदर्भात तातडीने योग्य कार्यवाही करण्याची मागणी आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांनी विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात तारांकित प्रश्नाद्वारे केली. या योजनेचे काम पूर्ण करण्यासाठी मार्च 2026पर्यंत भाववाढीशिवाय मुदतवाढ मंजूर करण्यात आली असून योजनेची कामे विहीत मुदतीत पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या स्तरावरून आवश्यक पाठपुरावा करण्यात येत आहे, असे लेखी उत्तर पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले.
न्हावाशेवा टप्पा क्र. 3 पाणीपुरवठा योजना काही तांत्रिक अडचणीमुळे अपूर्ण असल्याचे निदर्शनास आले आहे. या पाणीपुरवठा योजनेचा कार्यादेश डिसेंबर 2020मध्ये देण्यात आला असून काम पूर्ण करण्याची मुदत 30 महिन्यांपर्यंत असताना योजना कार्यान्वित न झाल्याने पनवेल महानगरपालिका क्षेत्रास पाणीटंचाईस सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे ही योजना तातडीने कार्यान्वित करुन पनवेल महापालिका हद्दीतील पाणीटंचाई दूर करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे, असा तारांकित प्रश्न आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांनी दाखल केला होता.
या प्रश्नावर पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील यांनी दिलेल्या उत्तरात सांगितले की, न्हावाशेवा टप्पा क्रमांक 3 पाणीपुरवठा योजना काही तांत्रिक अडचणीमुळे अपूर्ण असल्याची बाब खरी आहे. कोविड-19 या साथरोगाचा प्रादुर्भाव, मशीनरी, मनुष्यबळ उपलब्धता व हालचालीवर आलेली बंधने, मर्यादा, निविदा कार्यादेशानंतर स्टील साहित्याच्या दरात झालेली असाधारण भाववाढ व त्यामुळे पाईपपुरवठा करण्यास कंत्राटदाराकडून झालेला विलंब, पळस्पे फाटा ते भोकरपाडादरम्यानच्या राष्ट्रीय महामार्गलगतची अतिक्रमणे, कोविड-19च्या लॉकडाऊनपर्यंतच्या कालावधीत भू-संपादनाच्या कार्यवाहीस झालेला विलंब, जागेचा मोबदला न मिळाल्याने जलवाहिन्या टाकण्यास संबंधित जागामालकांचा अडथळा व रेल्वे, एक्सप्रेस वे, टोल प्लाझा क्रॉसिंग आणि ओएनजीसी परिसरातून जलवाहिनी टाकण्यास ओएनजीसीने परवानगी नाकारणे अशा बाबींसोबत ठेकेदार मे. जी.व्ही.पी.आर. इंजिनिअर्स हैदराबाद यांच्याकडून नियोजनानुसार काम होत नसल्याने निदर्शनास आले असून संबंधित या ठेकेदारावर दंडात्मक कारवाई सुरू आहे.
नवी मुंबई येथील नवीन विमानतळामुळे सभोवतालच्या परिसरामध्ये झालेल्या व होत असलेल्या विविध संस्था जसे की, राष्ट्रीय महामार्ग, एमएमआरडीए, एमएसआरडीसी यांच्यामार्फत सुरू असलेल्या रस्ते प्रकल्पामुळे योजनेतून टाकण्यात आलेल्या पाईपलाईनचे स्थलांतरण करणे अपरिहार्य होत आहे. पर्यायाने पूर्ण योजनेच्या भौतिक व आर्थिक गोष्टीवर बंधने येत असून कामास विलंब लागत आहे. सद्यःस्थितीत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत पनवेल महापालिका क्षेत्रास सद्यःस्थितीतील त्यांच्या मागणीनुसार पाणीपुरवठा करण्यात येत आहे. या योजनेचे काम पूर्ण करण्यासाठी मार्च 2026पर्यंत भाववाढीशिवाय मुदतवाढ मंजूर करण्यात आली असून योजनेची कामे विहीत मुदतीत पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या स्तरावरून आवश्यक पाठपुरावा करण्यात येत असून सद्यःस्थितीत योजनेचे काम सुरू असून प्रगतिपथावर आहे, असेही मंत्री गुलाबराव पाटील यांनी उत्तरात नमूद केले आहे.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांना महाराष्ट्र प्रदेश भाजप चिटणीसपदाची मोठी जबाबदारी

पनवेल : रामप्रहर वृत्तभारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीची घोषणा …

Leave a Reply