Breaking News

श्रीलंका सुपर 12 मध्ये; आयर्लंडचा 70 धावांनी पराभव

अबू धाबी : वृत्तसंस्था

वनिंदू हसरंगाची (71 धावा आणि 1 बळी) अष्टपैलू चमक आणि फिरकीपटू महीष थिक्षनाच्या (3/17) प्रभावी गोलंदाजीमुळे श्रीलंकेने ट्वेन्टी-20 विश्वचषकात आयर्लंडला 70 धावांनी नामोहरम केले. सलग दुसर्‍या विजयासह श्रीलंकेने ‘अ’ गटातून ‘अव्वल-12’ फेरी गाठणारा पहिला संघ ठरण्याचा मान मिळवला. श्रीलंकेने दिलेल्या 172 धावांचा पाठलाग करताना आयर्लंडचा संघ 18.3 षटकांत 101 धावांत गारद झाला. त्यांच्याकडून कर्णधार अँडी बलबिरीनने (41) एकाकी झुंज दिली. आता आयर्लंड आणि नामिबिया यांच्यातील लढतीचा विजेता या गटातून श्रीलंकेसह पुढील फेरीत आगेकूच करेल. टी-20 वर्ल्डकपच्या पात्रता फेरीत श्रीलंका विरुद्ध आयर्लंड या संघात झालेल्या सामन्यात श्रीलंकेने बाजी मारली. श्रीलंकेने 20 षटकात 7 गडी गमवून 171 धावा केल्या. आयर्लंडला विजयासाठी 172 धावांचं आव्हान दिलं होतं, मात्र आयर्लंडचा संघ सर्वबाद 101 धावा करू शकला. श्रीलंकेने आयर्लंडवर 70 धावांनी विजय मिळवला आहे. या विजयासह श्रीलंकेचं सुपर 12 मधलं स्थान जवळपास निश्चित झालं आहे. आयर्लंडला डावाच्या सुरुवातीला दोन धक्के बसले. पॉल स्टर्लिंग आणि केविन ओब्रायन झटपट बाद झाले. डेनली अवघ्या 2 धावा करून तंबूत परतला. त्यानंतर कर्णधार अँड्र्यु बालबीर्नीने कर्टिस कॅम्फरसोबत चांगली भागीदारी केली, मात्र महिशच्या गोलंदाजीवर कॅम्फरचा त्रिफळा उडाला. कॅम्फरने 28 चेंडूत 24 धावा केल्या. कॅम्फर बाद झाल्यानंतर एक एक खेळाडू तंबूत परतले. हॅरी टेक्टर, नेल रॉक, मार्क एडेर, अँड्र्यु बालबीर्नी, क्रेग यंग असे फलंदाज एक एक करत बाद झाले. श्रीलंकेची डावाची सुरुवात अडखळत झाली. सुरुवातीला श्रीलंकेचे तीन फलंदाज झटपट बाद झाले. कुसल परेरा (0), दिनेश चंडिमल (6) आणि अविष्का फर्नांडो (0) या धावसंख्येवर तंबूत परतले, मात्र चौथ्या गड्यासाठी पथुम निसांका आणि वनिंदू हसारंगा यांनी 123 धावांची मजबूत भागीदारी केली, तसेच संघाला मोठी धावसंख्या उभारून दिली. निसांकाने 61, तर हसरंगाने 71 धावा केल्या. त्यानंतर राजपक्सा आणि चमिका करुणारत्ने मोठे फटके मारण्यात अपयशी ठरले आणि बाद झाले. मात्र दासून शनाकाने 11 चेंडूत 21 धावांची खेळी करत संघाला मोठी धावसंख्या उभारण्यास मदत केली. 

Check Also

पनवेलमध्ये मानवी साखळीद्वारे जोरदार निदर्शने करत बांगलादेश सरकारचा निषेध

पनवेल : रामप्रहर वृत्त बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचाराविरोधात सकल हिंदू समाज रायगडच्या वतीने मंगळवारी (दि. 10) …

Leave a Reply