Breaking News

राहुल आवारेसह तीन भारतीय मल्लांना सुवर्णपदक

इस्तंबूल : वृत्तसंस्था

महाराष्ट्राचा प्रतिभावान मल्ल राहुल आवारेने युनायटेड वर्ल्ड रेसलिंग या शिखर संघटनेतर्फे आयोजित कुस्ती मानांकन मालिकेत मैदान मारताना सुवर्णपदकाला गवसणी घातली. त्याच्यासह सीमा आणि मंजूकुमारी या महिला मल्लांनीही भारताला सुवर्णपदक जिंकून दिले.

तुर्कस्थानची राजधानी इस्तंबूल येथे ही स्पर्धा सुरू आहे. राहुलने 61 किलो वजनगटामध्ये बाजी मारली. अंतिम फेरीत त्याने यजमान तुर्कस्थानचा मल्ल मुनीर अख्तास याच्यावर 4-1 असे सहजपणे वर्चस्व गाजविले. या मानांकन मालिकेतील राहुलचे हे पहिलेच सुवर्णपदक आहे. याच वयोगटात महाराष्ट्राच्याच उत्कर्ष काळे याला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.

सीमा हिने 50 किलो, तर मंजूकुमारी हिने 59 किलो वजनगटामध्ये अव्वल स्थान पटकावित या स्पर्धेतील भारतीय संघाची सुवर्णपदक संख्या शनिवारी तीनवर नेऊन ठेवली. 50 किलो गटाच्या अंतिम फेरीत सीमाने रशियाच्या व्हॅलेरिया चेपसाराकोवा हिची झुंज 3-2 अशी निसटत्या फरकाने मोडून काढली, तर मंजूने 59 किलो गटाच्या निर्णायक लढतीत बेलारूसच्या कॅत्सिरायना यानुशकेविच हिचा 13-2 असा सहजपणे धुव्वा उडविला.

– या स्पर्धेत खेळणारे खेळाडू मोठ्या स्पर्धांमध्ये प्रतिस्पर्धी असतात. त्यांना नमवून सुवर्णपदक जिंकल्यामुळे नवा आत्मविश्वास मिळाला आहे. आता जागतिक स्पर्धेच्या पात्रता फेरीवर संपूर्ण लक्ष केंद्रित करणार आहे.

-राहुल आवारे

Check Also

बेलपाडा येथील अनधिकृत झोपड्यांवर पनवेल महापालिकेची कारवाई

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीतील बेलपाडा गावाच्या मागे डोंगरावर अचानक अनधिकृतपणे उभ्या राहिलेल्या …

Leave a Reply