मेलबर्न ः वृत्तसंस्था
एक फलंदाज एका षटकामध्ये किती धावा करु शकतो? जर फलंदाजाने सर्वच्या सर्व सहा चेंडूंमध्ये सहा षटकार लगावले तर जास्तीत जास्त 36 धावा त्याला करता येतील, मात्र ऑस्ट्रेलियातील क्रिकेटपटू सॅम हॅरिसनने तब्बल आठ षटकार लगावले. क्लब सामन्यात नॅथन बेनेट या गोलंदाजाच्या सॅमने हा कारनामा केला. सोरेंटो डनक्रेगच्या सीनियर क्लबकडून खेळणार्या सॅमने एका षटकामध्ये तब्बल 50 धावा केल्या. नॅथनने क्रिकेटच्या इतिहासातील आतापर्यंतच्या सर्वांत वाईट षटकांपैकी एक षटक टाकले. बेनेटच्या प्रत्येक चेंडूवर सॅमने षटकार लगावला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे यामध्ये दोन नो बॉल नॅथनने टाकले. त्यावरही सॅमने षटकार लगावल्याने त्याचा षटकारांवर 48 आणि नो बॉलवर दोन अशा एकूण 50 धावा झाल्या. सामन्यातील 40व्या षटकामध्ये हा प्रकार घडला. हा कारमाना करणार्या सॅमने 39 षटकामध्ये आपले अर्धशतक पूर्ण केले होते. त्यानंतर त्याने आपले शतक साजरे केले. कोणत्याही फलंदाजाने 36पेक्षा अधिक धावा एका षटकात केल्याची ही पहिली घटना नाहीय. न्यूझीलंडमधील एका प्रथम श्रेणी क्रिकेटच्या सामन्यामध्ये बर्ट वेंसने एका षटकामध्ये 77 धावा दिल्या होत्या. हा एक विक्रम आहे.