आमदार रविशेठ पाटील करणार रस्त्याचे नूतनीकरण
सुधागड : रामप्रहर वृत्त
निसर्ग सौंदर्याने नटलेल्या आणि सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या अन् शिवकालीन इतिहासाची साक्ष देणार्या पाच्छापूर व दर्या गावाला जोडणार्या रस्त्याची आता दुर्दशा झाली आहे. रस्त्यावरून माणसांनाही चांगले मुश्किल झाले आहे. या रस्त्याच्या नूतनीकरण करण्यासाठी पाच्छापुर पंचक्रोशीतील नऊ गावच्या ग्रामस्थांनी पेण सुधागड विधानसभा मतदारसंघाचे कार्यतत्पर आमदार रवी पाटील यांची भेट घेतली असता या रस्त्याचे लवकरच नूतनीकरण करून पाच्छापूर ग्रामस्थांना सुंदर आणि चकचकीत रस्ता मिळणार असल्याचा ठाम विश्वास आमदार रवी पाटील यांनी ग्रामस्थांना दिला आहे. रस्त्याची पूर्ती चाळण झालेल्या रस्त्यासाठी पाच्छापूर व दर्गा गाव परिसरातील नऊ गावांच्या ग्रामस्थांनी यासाठी एल्गार पुकारलेला आहे. सुधागड तालुक्यातील पालीपासून बारा किलोमीटर अंतरावर असलेल्या पाच्छापूर गावाला जोडणार्या सहा किलोमीटरचा दर्या खोर्यातील रस्ता करणे खूप जिकरीचे होते. त्यावेळी पाच्छापुरातील ग्रामस्थ कै. माजी सरपंच शंकर बेलोसे, कृष्णाजी तांबट, बाबूशेठ घोसाळकर व सद्यस्थितीत समाज जीवनात कार्यरत असलेले एकनाथ ओंबळे, कमलाकर शिदोरे यांनी संघर्ष समितीच्या माध्यमातून रस्ता करण्यासाठी पुढाकार घेतला, मात्र सर्व नैसर्गिक आपत्तीवर मात करून 1980 साली माजी आमदार स्वर्गीय मोहन भाई पाटील यांच्या प्रयत्नामुळे रस्ता साकारला गेला. रस्ता होण्यासाठी पाच्छापुर मधील ग्रामस्थ घोसाळकर कुटुंबीय, रामजी हाळदे, धुळ्या राघू बावधाने यांनी आपल्या जमिनी दिल्याने रस्ता प्रत्यक्षात साकारला गेला अन 1988 मध्ये स्वर्गीय आमदार मोहन पाटील यांच्या प्रयत्ननाने पहिली एसटी धाऊ लागली, मात्र नैसर्गिक आपत्ती व प्रचंड पाऊस यामुळे रस्त्याची पडझड झाल्याने चंद्रकांत घोसाळकर यांच्या प्रयत्नाने तत्कालीन जिल्हा परिषद सदस्य सुधागडचे भाग्यविधाते वसंतराव ओसवाल यांच्या प्रयत्नातून जिल्हा परिषदेच्या निधीतून रस्त्याचे डांबरीकरण सरकारी ठेकेदार डी. डी. हजारे यांच्या माध्यमातून चांगल्या प्रकारे करण्यात आले. हा रस्ता खूप वर्ष टिकला आहे, मात्र पुन्हा रस्त्याची पडझड झाल्याने जिल्हा परिषदेचा 40 लाख रुपयाचा निधी वापरून रस्त्याची दुरुस्ती 2017 मध्ये पाच्छापूरचे माजी सरपंच चंद्रकांत घोसाळकर यांच्या प्रयत्नातून करण्यात आली, मात्र गेल्या काही वर्षात रस्त्याकडे संबंधित खात्याचे दुर्लक्ष झाल्याने रस्त्याचे रूपांतर खड्ड्यात झाले आहे.
या रस्त्यावरून माणसांना चालणेही सद्यस्थितीचे जिकरीचे झाले असून वाहने चालवणे तर दुरापास्त झाले आहे. या रस्त्याला नऊ ते दहा गावे जोडली असल्याने येथील नागरिकांना अनेक समस्यांना दररोज सामोरे जावे लागत आहे. पाच्छापूर पंचक्रोशीला ऐतिहासिक वैभव प्राप्त करून देणार्या सुधागड किल्ल्यावर हजारो पर्यटक पाच्छापूर मार्गे किल्ल्याला भेट देण्यासाठी येत असतात. या पर्यटकांनाही खूप मोठा सामना करावा लागतो. यासाठी पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी पेण सुधागडचे कार्य तत्पर आमदार रवी पाटील यांची भेट घेऊन रस्त्याची समस्या त्यांच्यासमोर मांडली. त्यांनी याबाबत संबंधित अधिकार्यांना सूचना देऊन या रस्त्याची पाहणी करून रस्त्याच्या नूतनीकरणाबाबत योजना तयार करावयास सांगितली आहे. यासाठी निधीही मंजूर करण्यात आला आहे .मात्र शासकीय तांत्रिक बाबींमुळे सदरचे काम प्रलंबित आहे, मात्र आगामी नवीन वर्षाला या रस्त्याचे नूतनीकरण चांगल्या प्रकारे होणार असून नागरिकांना स्वच्छ आणि सुंदर रस्ता लवकरच मिळणार असल्याचा ठाम विश्वास आमदार रवी पाटील यांनी नऊ गावच्या ग्रामस्थांना दिल्यामुळे ग्रामस्थामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.