थंड हवेचे ठिकाण म्हणून जसे माथेरान प्रसिद्ध आहे तसे माथेरान हे चामड्याच्या वस्तूंना विशेष महत्त्व आहे. थंड हवामानामुळे माथेरानमध्ये तयार होणार्या चामड्याच्या चपला, बूट यांना विशेष मागणी आहे, पण माथेरानमध्ये चामड्याच्या वस्तू बनविणारे कारागीर दिसेनासे झाले आहेत. माथेरानच्या चर्मोद्योगात जुने ज्येष्ठ कारागीर हे एकतर वृद्ध झाले आहेत किंवा ते हयात राहिले नाहीत. त्यात नवीन कारागीर बनले नाहीत आणि त्यामुळे प्रसिद्धीच्या झोतात असलेला चर्मोद्योग पारंपरिक पद्धतीने लोप पावत आहे.
महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात जागतिक दर्जा प्राप्त पर्यटक स्थळ म्हणून ओळखले जाणारे निसर्गरम्य माथेरानला लाखो पर्यटक निसर्गाचा आनंद घेण्यासाठी येत असतात. ब्रिटिशांनी शोधलेल्या माथेरान मध्ये 1885 साली ब्रिटिश राजवट चालू झाली आणि ब्रिटिशांनी आपल्या सुखसुविधा, तसेच आपल्या गरजा भागवण्यासाठी या ठिकाणी बंगले बांधले. बंगले बांधण्यासाठी सुतार, गवंडी आणि त्या घरांची, बंगल्यांची देखभाल करण्यासाठी माळी आणि तसेच घोडेस्वारी करण्यासाठी घोडेवाले यांचे वास्तव्य माथेरानमध्ये होऊ लागले. बारा बलुतेदार माथेरानमध्ये ब्रिटिशांची सेवा करण्यासाठी रुजू झाले. ब्रिटिशांनी माथेरानमध्ये आपले बंगले गावाच्या पश्चिम दिशेला बांधले आणि त्या ठिकाणी ब्रिटिशांची सेवा करण्यासाठी त्यांनी आणलेले बारा बलुतेदार यांच्यासाठी गावाच्या पूर्वेला घरे बांधून दिली.त्या बारा बलुतेदारमधील एक उद्योग म्हणजे चामड्याच्या चपला आणि बूट बनवणारे चर्मोद्योग. माथेरानमधील कारागिरांनी हाती बनवलेल्या चपला आणि बुटांची बनविण्याची कारागिरी यांच्या हातातून घडलेल्या वस्तू यांची ख्याती सातासमुद्रापार गेलेली आहे. माथेरानमधील चर्मोद्योग हा आता मुंबई पुण्यात व्यवसाय वाढला आहे.
माथेरान हे पर्यटनस्थळ असल्यामुळे गतकाळापासून माथेरानच्या चपला बुटांचे आकर्षण आणि येणार्या पर्यटकांच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरले आहे. 1945 सालापासून माथेरान शहरात व्यवसाय करण्यासाठी बांधलेल्या कापडिया मार्केट येथे चर्मकार समाजाची चामडे, तसेच चपला आणि बूट बनवण्यासाठी कच्चामाल लागत असे. याकरिता कै. बाळकृष्ण पवार यांची सर्वांना कच्चामाल वेळेवर मिळावा आणि सर्वांना रोजगार मिळावा यासाठी एक सहकारी सोसायटी स्थापन केली होती. या सोसायटीमधून सर्व कारागिरांना कच्च्या मालाची विक्री केली जात असे. त्यातून माथेरानमधील सर्वात पहिले चामड्याच्या वस्तू घडवून त्या चपला-बूट विकण्याचे पहिले दुकान सुरू झाले. रमेश फुटवेअर हे कृष्णा बागडे यांचे ते चामड्याच्या चपला बनविणारे आणि त्यांची विक्री करणारे पहिले दुकान उभे राहिले होते. या दुकानात एकापेक्षा एक दर्जेदार मापाच्या चामड्यापासून, तसेच सांबर या प्राण्यांच्या चमड्यापासून बनवलेल्या दुर्मिळ चपला मिळत असत. तसेच मौल्यवान समजल्या जाणार्या प्राण्यांच्या चामड्यापासून आणि शेळ्या-मेंढ्यांच्या चमड्यापासून बनवलेल्या चपला यांना विशेष मागणी असायची. त्यात मृत झाल्यानंतर म्हैस आणि बैल यांना गावाबाहेर फेकून दिले जायचे, त्या जनावरांचे चामडे काढून यांच्या चमड्यापासून दर्जेदार चपला बूट हे माथेरानमधील कारागीर यांच्या कुशल कारागिरीतून घडवत होते.
1952 ते 1953 सालची ही माहिती आहे, त्यानंतर ही कारागिरी व व्यवसाय 1970 ते 1975 सालापर्यंत चालू राहिला. नंतर माथेरान बाजारपेठमध्ये पवार फुटवेअर, रमेश फुटवेअर, ज्ञानेश्वर फुटवेअर या दुकानातून वाघाच्या चमड्यांचे चप्पल बूट, सांबरचे बूट चप्पल, सापाच्या चमड्याचे बूट चप्पल, माऊंटन गोट स्किन, मसडी प्रेस, ऍनिलीन लेदर असे एका पेक्षा एक दर्जेदार चामड्यापासून चामडी वस्तू बनविल्या जात व माथेरानच्या बाजारपेठेत या दुकानातून सिनेकलावंत, जॉकी, घोडेस्वार व श्रीमंत लोकांच्या पायामध्ये माथेरानच्या कारागिरांनी बनविलेल्या चपला व बूट हे लोक वापरत असत. या काळानंतर प्रभात फुटवेअर, शुशाईन फुटवेअर, राजन फुटवेअर अशी काही दुकानांनी माथेरानच्या चप्पल बुटांना तर एक वेगळेच महत्त्व प्राप्त करून दिले. आज माथेरानमध्ये हाती बनविणार्या चपला व बूट परदेशातसुद्धा विक्रीसाठी जातात व व्यवसायातील प्रतिसादसुद्धा उत्तम आहे. महाराष्ट्र शासनाच्या प्रदर्शनामध्ये ग्रामीण विकास यंत्रणा यांच्यामार्फत ओम लेदर आर्ट, मॉडन लेदर आर्ट यांच्या वतीने महाराष्ट्र व भारतभर शासनाच्या योजनेतून प्रदर्शनात माथेरानच्या चप्पल-बुटांकडे पाहण्याचा आणि माथेरानच्या चामडी वस्तूंचा दर्जा खूप दर्जेदार आहे. आज माथेरानची बूट चप्पल माथेरानला येणार्या पर्यटकांचे आजही महत्त्वाचे खरेदीचे माध्यम आहे.
माथेरानमधील श्री संत रोहिदास नगर म्हणजेच चर्मकार कुटुंबीयांचे वास्तव्य असणारे ठिकाण. या नगरमध्ये 15 ते 20 वर्षापूर्वीच्या काळापर्यंत आपण प्रवेश केलात की प्रत्येक घरात चपला बूट बनविण्याचे आवाज येत असत, मात्र त्या संत रोहिदास नगरातील कारागीर यांच्याकडून केल्या जाणार्या कामांचे आवाज आणि चामड्याचा सुगंध देखील आता येत नाही. याच जुन्या कारागिरांच्या कुशल कारागिरीतून एका पेक्षा एक असे उत्तम कारागीर या चर्मउद्योगाला लाभले आहेत. माथेरानच्या थंड वातावरणात बनवलेल्या चप्पल आणि बूट परदेशात नावलौकिक मिळवून आहेत. यात पवार फुटवेअर, रमेश फुटवेअर, ज्ञानेश्वर फुटवेअर ही काही नामवंत दुकाने माथेरानच्या मार्केटमध्ये असणारी दुकाने येथे येणार्या पर्यटकांचे आकर्षण बनून गेले होते. यानंतर काळे बंधू यांच्या प्रभात फुटवेअरने तर इतिहासच घडविला. जगातील घोडेस्वारी करणारे मोठमोठे जॉकी आणि सिनेकलाकार आणि क्रिकेटर यांच्यापर्यंत आपल्या कारागिरीतून माथेरानचे नाव सातासमुद्रापार पोहोचवले आहे. माथेरानच्या चर्मउद्योगाला एक नवीन महत्त्व प्राप्त करून दिलं. तो काळ माथेरानमधील दर्जेदार कारागिरांचा सुवर्णकाळ होता.कुशल डिझाईनचा आणि दर्जेदार कच्छा मालाचा आणि या कारागिरांनी बनवलेल्या चपला बुटांचा दर्जा आणि टिकाऊपणा तसेच चपला-बुटातील आकर्षण हे किमान चप्पल व बूट दीड ते दोन वर्ष आपल्या पायात घातली की त्यातून त्या व्यक्तीचा दिसणारा रुबाबदारपणा तत्काळ नजरेत भरतो. त्या चपला वापरणारे जणू काही आपल्या चालण्यातला रुबाबच वाढवत होता. काही पर्यटक तर माथेरानला निव्वळ चपला बूट घेण्यासाठीच येत असतात.
आज त्या काळात मिळणार्या चामड्याच्या वस्तू यांचा दर्जाचे चपला आणि बूट वापरण्यासाठी तर सोडाच परंतु पाहायला सुद्धा मिळत नाही याचं मूळ कारण आहे माथेरानमध्ये चपला बूट बनवणारा कारागीर आज खुंटला आहे. बदलत्या काळाप्रमाणे कष्ट कमी आणि व्यवसाय जास्त अशी येथील चर्मउद्योगातील व्यवसायिकांची मानसिकता झाली आहे. मुंबई, पुणे, कानपूर, दिल्ली आणि देशातील बड्या शहरातून तयार माल आणून हॅन्डमेड माल तयार केला जातो. म्हणून त्यापैकी काही दुकानातून विकल्या जात असलेल्या चपला-बूट पर्यटकांची फसवणूक केली जाते. दुप्पट-तिप्पट पैसे पर्यटकांकडून उकळले जातात. त्या सर्व चामड्याच्या वस्तू मुंबईमधील कुर्ला येथील ठक्कर बाप्पा कॉलनी येथून विक्रीसाठी आणल्या जातात. त्या बाहेरून मागावलेल्या चपला फक्त दिखाऊ चपला आणि बूट टिकाऊ दिसतात. माथेरानच्या चपला बुटांचे नाव मात्र धुळीस मिळून गेले आहे. माधवजी गार्डन येथे घेतलेली चप्पल अर्धा ताससुद्धा पर्यटकांच्या पायात टिकत नाही ही माथेरानच्या चर्मद्योगातील असणारी खेदजनक बाब आहे. माथेरान येथील चर्मोद्योगातील कारागिरी संपुष्टात आली असल्याने पुढील काळात माथेरानमधील चर्मोद्योगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलून जाऊन हा चर्मोद्योग फक्त उपजीविकेचं साधन राहील, अशी खंत आज असणार्या कारागिरांमध्ये आहे. तर नवीन पिढी काम करण्यास कंटाळा करते आणि चर्मोद्योगातील कुशल कारागीर व्हावं, असं कोणालाच वाटत नाही म्हणून चर्मोद्योगाला यापुढे चांगले दिवस येतील, असे कदापि वाटत नाही.
-संतोष पेरणे, खबरबात