कर्जत : प्रतिनिधी
कोरोना संकटात ग्राहक आणि कर्ज देणार्या बँकांची दरी वाढली होती. ती दरी मिटावी, यासाठी हा कर्ज मेळावा आयोजित केला आहे. दुर्गम भागातील गरीब व गरजू जनतेला व्यवसाय किंवा अन्य कामासाठी बँकांकडून सहकार्य घेऊन मदत करण्याचा आमचा हेतू असून त्यासाठी आम्ही आपल्या दारी आलो आहोत. त्याचा लाभ घेऊन आपण उद्योग व्यवसायाला लागावे, असे आवाहन बँक ऑफ इंडियाच्या रायगड विभाग प्रमुख शंपा बिश्वास यांनी बुधवारी (दि. 27) कर्जत येथे केले.
बँक ऑफ इंडिया या जिल्हा अग्रणी बँकेतर्फे बुधवारी कर्जतमधील रॉयल गार्डनच्या सभागृहात कर्ज मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. शंपा बिश्वास यांनी या मेळाव्याचे उद्घाटन केले. शेतकर्यांचे कौशल्य व शेती उत्पादनाची बाजारपेठ यांचा मेळ बसला तर शेती उद्योग भरभराटीला येईल, असा विश्वास विस्तार कृषी शास्त्रज्ञ डॉ. रवींद्र मर्दाने यांनी या वेळी व्यक्त केला. जिल्हा कृषी अधिकारी उज्वला बानखेले यांनी या मेळाव्यात सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग व कृषी पायाभूत सुविधांची सविस्तर माहिती दिली.
या कर्ज मेळव्यात आठ बँका सहभागी झाल्या असून 66 जणांना दोन कोटी शहात्तर लाख रुपयांचे वाटप करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक विजय कुलकर्णी यांनी दिली. कर्जत नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉ. पंकज पाटील, नायब तहसीलदार सुधाकर राठोड, मनोहर पादिर यांची या वेळी समयोचीत भाषणे झाली. स्नेहल हंडगर यांनी सूत्रसंचालन केले. तर सौम्या गुज्जर यांनी आभार मानले. मार्केटिंग जिल्हा व्यवस्थापक सिद्धेश राऊळ, तालुका व्यवस्थापक राजू नेमाडे, रमण पारकर, राम ब्रह्मांडे, गौरव पांडे, सुरेंद्र उपाध्ये, विशाल पाटील, दिलीप बडेकर, मनोहर हरपुडे, अरुण वेहले, जयवंत मते यांच्यासह ग्राहक व बचत गटाच्या महिला या वेळी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.