Breaking News

लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा ग्रामस्थांसह सिडकोच्या पोकलेनसमोर ठिय्या

ओवळे गावात तोडक कारवाईसाठी आलेले पथक माघारी

पनवेल ः रामप्रहर वृत्त
पनवेल तालुक्यातील ओवळे गावात तोडक कारवाई करण्यासाठी आलेल्या सिडकोच्या अतिक्रमणविरोधी पथकाला माघारी परतवून लावण्याचे काम माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी (दि. 9) करण्यात आले. या वेळी ग्रामस्थांच्या संरक्षणासाठी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी सिडकोच्या पोकलेनसमोर ग्रामस्थांसह ठिय्या आंदोलन केले.
दरम्यान, लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ कृती समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील, आमदार महेश बालदी, सामाजिक कार्यकर्ता निलेश पाटील, युवा नेते दशरथ भगत, जे. डी. तांडेल यांनी या ठिय्या आंदोलनाला भेट देऊन पाठिंबा दिला, तर सायंकाळी सिडको अधिकारी, जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा झाली. त्यानंतर सिडकोच्या पथकाला रिकाम्या हाती परतावे लागले. येत्या तीन ते चार दिवसांत या संदर्भात सिडको, लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ कृती समिती, ग्रामस्थ यांच्यात बैठक होणार आहे. या बैठकीत योग्य पुनर्वसनाचा सकारात्मक तोडगा निघाला तरच कार्यवाही करण्यास सहमती असेल, असा इशारा समितीने सिडकोला दिला आहे.
भूमिपुत्र, स्थानिक, प्रकल्पग्रस्त शेतकरी, ग्रामस्थांच्या सदैव पाठीशी राहणारे 70 वर्षीय लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी ओवळे ग्रामस्थांच्या पाठीशी ठामपणे राहून ठिय्या आंदोलन केल्याने गावकर्‍यांनी त्यांचे कौतुक केले आणि आभारही मानले. अंगावरून बुलडोझर नेला तरी चालेल, पण जोपर्यंत कारवाई थांबवत नाही तोपर्यंत येथून उठणार नाही, असा पवित्रा लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी या वेळी घेत ग्रामस्थांना मोठा आधार दिला. त्यामुळे आंदोलकांमध्ये बळ संचारल्याचे दिसून आले. प्रेरणास्थान दि. बा. पाटील यांनी आम्हाला संघर्षाशिवाय काहीही मिळत नाही हे शिकवले आहे. त्यांचा आशीर्वाद व आदर्शाने आम्ही काम करीत असून भूमिपुत्रांच्या हक्कासाठी लढत राहू, संघर्ष करत राहू, असेही लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी या ठिकाणी अधोरेखित केले.
सिडकोच्या अतिक्रमणविरोधी पथकाने शुक्रवारी मोठा पोलीस बंदोबस्त आणि सिडको सुरक्षा रक्षकांच्या फौजफाट्यासह बुलडोझर, पोकलेन घेऊन येत ओवळे येथे कारवाई करण्याचा प्रयत्न केला. या वेळी केंद्र सरकारच्या एका प्रकल्पासाठी केवळ रिक्त शाळेवर कारवाई करणार आहोत, असे सिडको अधिकार्‍यांचे म्हणणे होते, मात्र त्या कारवाईच्या आड येथील तीन पात्र घरेदेखील तोडण्याचा सिडकोचा मनसुबा असल्याने ग्रामस्थांनी विरोध केला.
या वेळी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी बुलडोझरसमोर ठिय्या देत अतिक्रमणविरोधी पथकाला रोखून धरले. पावसाळ्यात तोडक कारवाई न करण्याचे आदेश असतानासुद्धा अतिक्रमणविरोधी पथकाचे अधिकारी ढगे यांचे ढग ओवळे गावावर कसे काय जमले, असा प्रश्न जनमानसातून उपस्थित होत होता.
या वेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी म्हटले की, पनवेल तालुक्यातील खालचे ओवळे येथे घरे तोडण्यासाठी सिडको अधिकारी पोलीस फौजफाट्यासह आले. महिला भगिनी, ज्येष्ठ नागरिक आणि अपंग व्यक्ती या कारवाईमुळे रडत आहेत. येथील ग्रामस्थांचे म्हणणे आहे आमचे कुठल्याही प्रकारे पुनर्वसन नाही. आमच्या घराची पात्रता नाही. कुठे जागा आणि पुनर्वसन करणार याचाही अद्याप पत्ता नाही. असे असतानाही घरांना हात लावत असाल तर कोणत्याही परिस्थितीत कारवाई करू देणार नाही. हा निर्धार करूनच ग्रामस्थ आंदोलनाला बसले आहेत. मला ग्रामस्थांचा फोन आला. त्या अनुषंगाने आम्ही तत्काळ या ठिकाणी आलो. गोरगरिबांची घरे तोडण्यासाठी आणि संसार उद्ध्वस्त करण्यासाठी फार मोठा फौजफाटा सिडकोने का आणला? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर तेव्हाच्या प्रकल्पग्रस्त समितीच्या माध्यमातून महेंद्र घरत, बबन पाटील यांनी जाऊन घरांच्या बाबतीत मुख्यमंत्र्यांसमोर प्रश्न मांडला होता. त्या निवेदनावर आमचीही स्वाक्षरी आहे. त्या वेळी योग्य पुनर्वसन झाल्याशिवाय घरे तोडली जाणार नाहीत, अशी ग्वाही त्यांनी दिलेली आहे. मुख्यमंत्र्यांनी शब्द दिला आहे, मात्र सिडकोचे अधिकारी येथे घरे तोडायला आले. पोलीस गाड्या, पोकलेन, जेसीबी आणले आहेत. ते आमच्या अंगावरून गेले तरी चालतील, पण आम्ही येथून हलणार नाही, असा पवित्रा लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी घेतला.
लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी सिडको अस्थापानावर ठपका ठेवत सांगितले की, प्रकल्पग्रस्तांची गरज, मागण्या आणि पुनर्वसन याकरिता सिडको अजिबात कार्यतत्परता दाखवत नाही, पण कारवाई करताना मात्र ते वायूच्या वेगाने हजर होतात. आज पावसाळ्यातदेखील तोडक कारवाई होत आहे. त्यामुळे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिवंगत माजी खासदार दि. बा. पाटील यांचे नाव देण्यासाठी आम्ही जे आंदोलन करीत आहोत त्याचा सिडको सूड तर उगवत नाही ना? असा संशय आमच्या मनात येऊ लागला आहे. प्रकल्पग्रस्तांवर अन्याय म्हणजेच 95 प्रकल्पग्रस्त गावांवर अन्याय आहे आणि तो कदापिही खपवून घेणार नाही, असेही त्यांनी ठणकावले.  
या आंदोलनात रामशेठ ठाकूर यांच्यासह प्रकल्पग्रस्त लॉरी चालक-मालक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष नंदराज मुंगाजी, अ‍ॅड. रेश्मा अमित मुंगाजी, तंटामुक्ती गाव अध्यक्ष अमित मुंगाजी, मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक राजेंद्र पाटील, कुंडेवहाळचे सरपंच सदाशिव वास्कर, सदस्य दत्ता पाटील, सुनील म्हात्रे, विश्वनाथ म्हात्रे, अमिर म्हात्रे, सुनील पाटील, गजानन पाटील आदींसमवेत ग्रामस्थ आणि प्रकल्पग्रस्त बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
या वेळी नंदराज मुंगाजी यांनी म्हटले की, सिडकोचा अतिक्रमण विभाग गावात येऊन तोड कारवाई करणार आहे हे समजताच आम्ही या ठिकाणी दाखल झालो तसेच तातडीने ग्रामस्थांना सहकार्य करण्यासाठी लोकनेते रामशेठ ठाकूर ग्रामस्थांसोबत ठिय्या मांडून बसले. विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्यासाठी झालेल्या आंदोलनाचा राग काढण्यासाठी कारवाई करीत असाल तर आम्ही सिडकोला दाखवून देऊ की हे विमानतळ होणार नाही. आम्हाला घरांची पात्रता मिळाली आणि योग्य पुनर्वसन झाले तरच आम्ही घरे खाली करू. नाही तर अजिबात शासनाचे ऐकणार नाही. तुमचा बुलडोझर परत न्या. पावसाळ्याचे दिवस आहेत आणि तुम्ही घरे तोडायला येता. आम्ही भूमिपुत्र आहोत, आम्हाला न्याय द्या. आम्ही सहकार्य करतो. तसे तुम्हीही करा.
सामाजिक कार्यकर्ता रुपेश धुमाळ यांनी बोलताना सांगितले की, कोरोना आणि पावसाळा पाहता लोकांना बेघर करणे उचित नाही. विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्यासाठी लाखो भूमिपुत्र रस्त्यावर उतरले हे सरकारला माहीत आहे. एवढा मोठा प्रसंग आणि पावसाळा असताना घरे तोडण्याचे आदेश दिले जाते हे अत्यंत चुकीचे आहे. देशाच्या विकासासाठी येथील लोकांनी पिकत्या जमिनी, राहती घरे दिली आहेत. या त्यागाचा विसर शासनाला, सिडकोला पडला आहे. सिडकोने येथील लोकांशी कृतज्ञ राहिले पाहिजे.

Check Also

टीआयपीएल रोटरी प्रीमियर लीग उत्साहात

माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते बक्षीस वितरण पनवेल ः रामप्रहर वृत्तरोटरी प्रांत 3131मधील …

Leave a Reply