नवी मुंबई : प्रतिनिधी
सानपाडा प्रभाग 76 मधील सेक्टर 2, 3, 4 व 8 या परिसरात पथदिव्यांची समस्या गंभीर असून रहिवाशांना अंधारात ये-जा करावी लागत आहे. अनेक भागात पथदिवे बंद आहेत, तर काही ठिकाणी पथदिव्यांची दुरावस्था झाली असल्याने नवी मुंबई मनपाने पथदिवे त्वरित दुरुस्त करावेत, अशी मागणी भाजपचे नेते पांडुरंग आमले यांनी मनपाकडे केली आहे. सानपाडा सेक्टर 8 मधील कोहीनूर सोसायटीच्या जवळील पथदिव्याचा बल्ब असलेला बॉक्स अडीच महिन्यांपूर्वी पावसाळ्यात वार्यामुळे पडला असून तो आजतागायत बंदच आहे. या पथदिव्याच्या दुरुस्तीबाबत अडीच महिन्यांत पालिका प्रशासनाकडून कोणतीही कार्यवाही झालेली नाही. प्रभागात अंधारामुळे वाटमारी, लुटमार, छेडछाड व विनयभंग अथवा अन्य काही दुर्घटना घडण्याची भीती आहे. या प्रभाग 76 मधील रहिवाशांच्या समस्या सोडविण्यासाठी संबंधितांना पथदिव्यांच्या दुरूस्तीचे आदेश देवून स्थानिक रहीवाशांना दिलासा द्यावा, अशी मागणी पांडूरंग आमले यांनी महापालिका आयुक्तांकडे दिलेल्या निवेदनात केली आहे.