पनवेल, उरण : वार्ताहर
दिवाळी म्हटली की आकाश कंदिलाच्या प्रकाशाने अवघे घर उजळून निघते व मांगल्याचे वातावरण तयार होते. या सणाला अवघे मोजकेच दिवस उरले असल्याने पनवेल व उरणमधील बाजारपेठा रंगीबेरंगी आकाश कंदिलांनी प्रकाशमय झाल्या आहेत. यंदाची दिवाळी उत्साहात साजरी होणार असून, दिवाळीपूर्वीच्या खरेदीसाठी बाजारपेठा गजबजू लागल्या आहेत, तसेच दुकानांमध्ये लावण्यात आलेले वेगवेगळ्या आकारातील आकाश कंदिल ग्राहकांचे लक्ष वेधून घेत असून, खरेदीसाठी गर्दी होत आहे. कोरोना विषाणूच्या सावटामुळे नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून मागील वर्षी दिवळी सणांवर निर्बंध आणले होते, मात्र यंदाच्या वर्षी दिवाळी मोकळ्या वातावरणात साजरी होणार आहे. त्यामुळे दिवाळीपूर्वीच्या खरेदीसाठी नागरिक बाहेर पडू लागले आहेत, तसेच बाजारपेठाही दिवाळी सणासाठी सज्ज झाल्या असून, विविध प्रकारच्या आकाश कंदिलांनी बाजारपेठा गजबजल्या आहेत. दिवाळीत आकाश कंदिलांचे सर्वांनाच आकर्षण असते. घराच्या छतावर पडवीत कंदिल लावले जातात. दिवाळीनिमित्त बाजारात यंदा विविध आकार आणि प्रकारातील कंदिल उपलब्ध झाले आहेत. यंदा बाजारात वेगवेगळ्या आकारातील आकर्षक आकाश कंदिल दाखल झाले आहेत. यामध्ये घुमट, त्रिकोणी, चौकोनी, चांदणी, लंबाकूठी, गोलाकार, पॅरेशूट हंडी या आकारातील कंदिल कापड, स्पंज, कागद, बांबूच्या काड्या, लाकूड यापासून बनविलेले कंदिलांचा समावेश आहे. यामध्ये ग्राहक स्वदेशी बनावटीच्या कंदिलाची सर्वाधिक पसंती देत आहेत. हे आकाश कंदिल 50 रुपयांपासून ते एक हजार रुपयांपर्यंत विक्रीसाठी उपलब्ध आहेत. काही ठिकाणी स्थानिक कारागिर कंदिल बनवून त्यांची विक्री करत असून, त्यांनाही ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. यंदा कंदिलाच्या दरात 10 ते 15 टक्क्यांनी वाढ झाली आहे. कोरोनाचा प्रभाव कमी झाला असल्याने दिवाळी खरेदीसाठी बाजारात उत्साह दिसत आहे. त्यामुळे दिवाळीपूर्व खरेदीसाठी बाजारात गर्दी दिसत आहे.
उरण बाजार पेठेत गांधी चौक, राजपाल नाका, सेंट मेरीज हायस्कूल जवळ आदी ठिकाणी कंदील विक्री केली जाते. कंदील 10 रुपयांपासून दोन हजार रुपये किमतींपर्यंत विक्रीस आहेत.
-संजय म्हात्रे, कंदील विक्रेते