माणगाव : प्रतिनिधी
छत्रपती शिक्षण मंडळ- कल्याण या संस्थेच्या वडघर मुद्रे (ता. माणगाव) येथील सरस्वती विद्यामंदिर तथा कैलासवासी शंकर सीताराम देशमुख विद्या संकुलात कै. सुभाष देशमुख यांच्या द्वितीय पुण्यस्मरण दिनानिमित्त नागरिक सेवा फाउंडेशनतर्फे विविध स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. त्याचा पारितोषिक वितरण समारंभ शनिवारी झाला.
कै. सुभाष देशमुख यांनी स्वतःची नोकरी सांभाळून या पंचक्रोशीतील मुलांना दहावीपर्यंत शिक्षण घेता यावे म्हणून मोठ्या कष्टाने ही शाळा, हे संकुल उभे केले आहे. शाळेची गुणवत्ता टिकावी यासाठी त्यांनी जीवनाच्या शेवटपर्यंत लक्ष दिल्याचे संस्थेचे संस्थापक डॉ. दीपक देशमुख यांनी या वेळी सांगितले. विद्यालयाचे मुख्याध्यापक नागनाथ सुर्वे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षक राजन पाटील यांनी केले. या वेळी हस्ताक्षर स्पर्धा, सामान्य ज्ञान स्पर्धा, देशभक्तीपर गीत गायन स्पर्धेतील विजेत्यांना बक्षिसे व दहावीमध्ये 75टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी विद्यालयाच्या प्रांगणात मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपणही करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्या शिर्के यांनी केले. संस्थेचे सल्लागार संजय गांधी, अध्यक्ष रत्नदीप आमरे, सचिव भालचंद्र खाडे, बाबाजी रिकामे, पोलीस पाटील मनोहर धुमाळ, सरपंच पुष्पा साळवी यांच्यासह विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि ग्रामस्थ या वेळी उपस्थित होते. सुरेश भेदाटे यांनी आभार मानले.