अलिबाग : रामप्रहर वृत्त
साहित्यसंपदा समूह अलिबाग या संस्थेतर्फे दिला जाणारा ‘साहित्यरत्न पुरस्कार’ पनवेलचे ज्येष्ठ गजलकार ए. के. शेख यांच्या ‘छंदाक्षरी’ या ग्रंथाला प्रदान करण्यात आला. मराठी गजलचे शास्त्र व तंत्र शिकण्यास उपयुक्त असणारा हा ग्रंथ अल्पावधीतच वाचकप्रिय ठरला आहे. त्याबरोबर रमेश धनावडे यांच्या ‘जीवन गाणे’, श्रीकांत पेटकर यांच्या ‘कल्याण’ या पुस्तकांसही ‘साहित्यरत्न’ हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. साहित्य क्षेत्रातील ज्ञानदानाबद्दल वृषाली जोगळेकर यांना ‘साहित्य सेवा’ हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले, तसेच साहित्यसंपदा समूहातर्फे घेण्यात आलेल्या अखिल भारतीय काव्यलेखन, हायकूलेखन, गझललेखन व कथालेखन या स्पर्धांच्या विजेत्यांना सन्मानचिन्हे आणि प्रमाणपत्रे मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आली.
शनिवारी (दि. 20) सार्वजनिक वाचनालय आणि जिल्हा ग्रंथालय, अलिबाग येथे झालेल्या गजल प्रशिक्षण कार्यशाळेत हे पुरस्कार देण्यात आले. या वेळी साहित्यसंपदा विशेषांकाचे गजलकार ए. के. शेख यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. या वेळी अलिबाग नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षा मानसी म्हात्रे, जिल्हा वाचनालय व जिल्हा ग्रंथालयाच्या कार्याध्यक्षा शैला पाटील, ‘कोकणनामा’चे संपादक उमाजी केळुसकर, रायगड जिल्हा पत्रकार संघाचे उपाध्यक्ष नागेश कुलकर्णी, अंधश्रद्धा निर्मूलन समिती महाराष्ट्र राज्याचे सचिव नितीन राऊत, साहित्यसंपदा समूहाचे संस्थापक वैभव धनावडे आदी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मनोमय मीडिया, नमिता जोशी, सई माईणकर यांनी परिश्रम घेतले.