उध्दवा अजब तुझे सरकार; महाड आगारातून दोन बसेस रवाना
महाड : प्रतिनिधी – महाड आणि पोलादपूरमधुन परप्रांतीय मजुरांना मध्य प्रदेश येथे जाण्यासाठी पनवेल रेल्वे स्थानकापर्यंत सोडण्यासाठी शनिवारी (दि. 9) महाड आगाराच्या वतीने दोन बस सोडण्यात आल्या. दरम्यान, 41 प्रवाशांना घेवून शनिवारी दुपारी 12 वाजता या बसेस पनवेलकडे रवाना झाल्या. मात्र तालुक्यातील भूमिपुत्र मुंबई, पुण्यातून गावी येण्यासाठी पायपीट करीत आहेत.
महाड तालुक्यातील हजारो परप्रांतीय मजूर आणि कामगारांनी आरोग्य दाखला मिळविण्यासाठी ग्रामीण रुग्णालयात रांगा लावल्या आहेत. मात्र प्रवासासाठी त्यांच्या वाहनांचा प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान, शनिवारी तहसिल कार्यालयाकडून महाड आगाराला बसेस उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली होती. या मागणीनुसार महाड आगारातून पनवेल रेल्वे स्टेशनला 22 मजूर आणि पोलादपूर (देवडा) येथून 19 मजुरांना घेवून बसेस रवाना करण्यात आल्या. यासाठी संबंधित ठेकेदाराने एसटीला पैसे भरले आहेत. आयत्यावेळी बसची मागणी झाल्यामुळे महाड आगार व्यवस्थापकांची धावपळ झाली.
या वेळी बस चालक आणि त्याच्या सोबत एक नोडल अधिकारी असे कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. या बसेसचे प्रवासापूर्वी आणि नंतर निर्जंतुकीकरण केले जाईल, अशी माहिती आगार व्यवस्थापक अनंत कुलकर्णी यांनी दिली आहे. तसेच आरोग्य प्रमाणपत्र आणि तहसीलदारांचे प्रवास पत्र असल्यास 22 जणांच्या गटाला 44 रुपये प्रति किमी या दराने बस बुक करता येईल, अशीही माहिती कुलकर्णी यांनी दिली.