Breaking News

पनवेल रेल्वे स्टेशनवरील सुविधांची प्रवासी सुविधा समितीकडून पाहणी

फलाटावर लिफ्ट बसवण्याच्या सूचना

पनवेल : प्रतिनिधी

रेल्वेच्या प्रवासी सुविधा समितीने बुधवारी संध्याकाळी पनवेल रेल्वे स्टेशनवरील सुविधांची पाहणी केली. या वेळी रेल्वेच्या अधिकार्‍यांना पनवेल रेल्वे स्टेशनवरील लोकलच्या फलाटावर लिफ्ट किंवा रॅम्प बसवण्याचे काम 15 डिसेंबरपूर्वी पूर्ण करण्याची सूचना दिली आहे. या लिफ्टमुळे ज्येष्ठ नागरिक, महिला व रुग्णांची पनवेल रेल्वे स्टेशनवर जिना चढून जाताना होणार्‍या त्रासातून लवकरच सुटका होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

रेल्वेची प्रवासी सुविधा समिती महाराष्ट्राच्या दौर्‍यावर आली असताना समितीचे चेअरमन खासदार पी. के. कृष्णदास यांच्यासह समितीचे सदस्य कैलाश वर्मा, डॉ. राजेंद्र फडके, उमा रानी, विभा अवस्थी व के. रविचंद्रन लोकलने पनवेल स्टेशनवर आले. त्यांच्यासोबत रेल्वेचे सीनियर डीसीएम झा व इतर अधिकारी होते. या वेळी पनवेलला त्यांचे स्वागत नगरसेवक अ‍ॅड. मनोज भुजबळ, तेजस कांडपिळे, भाजपचे नंदकुमार पटवर्धन यांनी केले. यावेळी प्रवाशी संघटनेचे डॉ. भक्तीकुमार दवे, पनवेल स्टेशन प्रबंधक एस. एम. मीना रेल्वे पोलीस निरीक्षक जसबीर राणा उपस्थित होते.

समितीचे चेअरमन खासदार पी. के. कृष्णदास यांनी पनवेल स्टेशनवरील सर्व फलाटावर फिरून प्रवाश्यांची चौकशी केली. फलाटावर बसण्याची सुविधा नसल्याचे अनेकांनी सांगितल्यावर सामाजिक संस्था किंवा नगरसेवक निधीतून त्या ठिकाणी बसण्याची व्यवस्था करण्याची सूचना देण्यात आली. फलाटावरील उखडलेल्या लाद्या, स्टेशनमध्ये प्रवेश करतानाचा रस्ता तातडीने दुरुस्त करण्याची ही सूचना देण्यात आली. अ‍ॅड. मनोज भुजबळ यांनी साई मंदिर पाडण्यात येऊ नये अशी मागणी केली. पी. के. कृष्णदास यांनी मंदिराला भेट देऊन त्यामुळे कोणताही अडथळा येत नसल्याची खात्री त्यांनी केली.

पनवेल रेल्वे स्टेशनवर लोकलच्या फलाटावरून नवीन पनवेल बाजूला जाताना जिन्यावरून जाताना ज्येष्ठ नागरिक, महिला व रुग्णांना होणारा त्रास कमी होण्यासाठी लवकरच लिफ्ट किंवा रॅम्प बसवण्याच्या सूचना अधिकार्‍यांना देण्यात आल्या. हे काम 15 डिसेंबरपर्यंत झाले का याची पाहणी करण्यासाठी सदस्य कैलाश वर्मा यांनी आपण येणार असल्याचे सांगितले. या वेळी प्रवाशी संघटनेने पनवेल-वाराणशी गाडी आठवड्यातून दोन वेळा सुरू करण्याची व सामान उचलण्यासाठी स्टेशन सेवक (कुली) नेमण्याची मागणी केली.

Check Also

रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये प्रदर्शन; रोबोट आकर्षण

खारघर ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये …

Leave a Reply