Breaking News

गुजरात हाय अलर्टवर!

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था

गुजरातमध्ये आत्मघातकी दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता आहे. त्यामुळे गुजरातमध्ये हाय अलर्ट घोषित करण्यात आला आहे. गुप्तचर यंत्रणांनी ही माहिती गुजरात पोलिसांना दिली आहे. राज्य गुप्तचर यंत्रणेने हा अलर्ट जारी केला असून मल्टीप्लेक्स, रेल्वे स्थानके, धार्मिक स्थळांच्या ठिकाणी आत्मघातकी बॉम्बहल्ल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आत्मघातकी हल्लेखोरांच्या पथकात हैदराबादमधल्याच एकाचा समावेश असल्याची माहिती गुप्तचर यंत्रनांना मिळाली आहे. पाकिस्तानस्थित जैश-ए-मोहम्मद संघटनेशी संबंधित असलेल्या या आरोपीची पुलवामा दहशतवादी हल्ल्यामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका असल्याचे निदर्शनास आले आहे. याबाबतचे काही पुरावेही गुप्तचर यंत्रणांच्या हाती लागल्याची सूत्रांची माहिती आहे. हा कट यशस्वी करण्यासाठी आरोपीबरोबर एक वृद्ध महिला असून, दोघांची रेल्वे स्टेशनवर घातपात घडवण्याची योजना आहे, असे या अहवालात म्हटले आहे. पुलवामा आत्मघाती हल्ल्यातील प्रमुख असणार्‍या आदिल अहमद दारने त्याच्या 10 मिनिटांच्या व्हिडीओमध्ये दिल्ली, गुजरातमध्ये दहशतवादी कारवायांचा उल्लेख केला आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय गुप्तचर यंत्रणाही अधिक सतर्क झाल्या आहेत. हाय अलर्ट घोषित केल्यानंतर गुजरात आणि आसपासच्या भागातील प्रत्येक संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी विशेष टीम्स बनवण्यात आल्या आहेत. यातील जवान गुजरातसह आजूबाजूचा संपूर्ण परिसर पिंजून काढणार आहेत. किनारपट्टी आणि पाकिस्तान सीमेला लागून असणार्‍या भागात गुजरात पोलिसांनी आपली गस्त वाढवली आहे. जम्मू-काश्मीरच्या पुलवामामध्ये 14 फेब्रुवारीला आदिल अहमद दार या क्रूर आत्मघातकी दहशतवाद्याने स्फोटकांनी भरलेली गाडी सीआरपीएफ जवानांच्या बसला धडकवली. यात 40 जवान शहीद झाले आहेत. त्यानंतर लगचेच पाकिस्तान पुरस्कृत जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती. त्यानुसार यापुढे पुलवामापेक्षाही भीषण आत्मघाती हल्लाचा कट जैश-ए-मोहम्मदच्या गोटात शिजत असल्याची गोपनीय माहिती गुप्तचर यंत्रणांना मिळाली आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून गुजरातमध्ये हाय अलर्ट घोषित करण्यात आला आहे.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply