Breaking News

उद्यापासून रंगणार रायगड प्रीमियर लीग

उरण : प्रतिनिधी
आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांची पावनभूमी असणार्‍या पनवेल तालुक्यातील शिरढोण येथील भव्य आद्य क्रांतिवीर मैदानावर रायगड प्रीमिअर लीग (आरपीएल) ही क्रिकेटची भव्य स्पर्धा 2 नोव्हेंबरपासून मोठ्या उत्साहात सुरू होत आहे. 12 नोव्हेंबरपर्यंत चालणार्‍या या स्पर्धेत रायगड जिल्ह्यातील 32 क्रिकेट संघांमध्ये क्रिकेटचा थरार रसिकांना अनुभवता येणार आहे. क्रिकेटच्या या कुंभमेळ्याचे अर्थात स्पर्धेचे उद्घाटन भाजप नेते आमदार आशिष शेलार यांच्या हस्ते सकाळी 11 वाजता होणार आहे. उद्घाटन समारंभास माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष तथा पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर, उरण विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश बालदी, भाजप पनवेल तालुकाध्यक्ष अरुण भगत, पनवेल महापालिका सभागृह नेते परेश ठाकूर यांच्यासह सर्वपक्षीय नेते उपस्थित राहणार आहेत. या भव्य स्पर्धेतील विजेत्या संघाला तीन लाख व भव्य चषक देऊन गौरविण्यात येणार आहे. उपविजेत्या संघाला दोन लाख व भव्य चषक आणि तृतीय विजेत्यास एक लाख व भव्य चषक देण्यात येईल. त्याचप्रमाणे इतर चौथ्या ते आठपर्यंतच्या संघांना प्रत्येकी 50 हजारांचे बक्षीस आहे. मालिकावीराला स्पोर्टस् बाईक, तर उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज व क्षेत्ररक्षक यांना स्पोर्टस् सायकल देण्यात येणार आहे. या वेळी महेश बालदी यांच्या आमदार निधीतून उभारण्यात आलेल्या क्रिकेट मैदानावरील दोन प्रेक्षक गॅलरींचे लोकार्पण करण्यात येणार आहे. या स्पर्धेचे आयोजन शिरढोण येथील अचानक मित्र मंडळाने केले असून स्पर्धेच्या माध्यमातून रायगडातील प्रतिभावंत क्रिकेटपटूंना आपला खेळ दाखवण्याची संधी मिळेल, असे आरपीएलचे आयोजक व अचानक मित्र मंडळाचे अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांनी म्हटले आहे.

Check Also

खासदार बारणेंच्या विजयासाठी पनवेलमध्ये जोरदार प्रचार

आमदार प्रशांत ठाकूर, माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांचा सहभाग पनवेल : रामप्रहर वृत्त मावळ …

Leave a Reply