कळंबोली : रामप्रहर वृत्त
कळंबोली वसाहतीतील रस्त्यांची दुरवस्था झाली असून त्यास सिडको अधिकारी जबाबदार असल्याचा आरोप येथील नागरिकांनी केला आहे. अधिकार्यांच्या संगनमताने रस्ता खोदून केबल, वायर, पाइपलाइन टाकण्यात येत आहेत. सुटीचा दिवस बघून रस्ते खोदकाम करण्याचे संदेशच काही मिठाईच्या बदल्यात सिडको अधिकारी देत असल्याची माहिती मिळत आहे.
सिडकोची कोणतीही परवानगी न घेता अधिकार्यांना लक्ष्मी दर्शन देऊन कळंबोली, कांदा कॉलनी वसाहतीतील रस्ते खोदून मोबाइल टॉवरवाले, बिल्डर, चप्पल, दूध दुकानदार, पान टपरीधारक, खाजगी सोसायटीवाले रस्ता खोदून केबल, पाण्याची पाइपलाइन, लाईट कनेक्शन घेताना दिसून येतात, तसेच तो रस्ता दुरुस्त न करता तसाच सोडून देतात त्यामुळे या शहरातील रस्त्यांची अतीदयानिय अवस्था झाली आहे. रविवारी केएलई कॉलेजजवळील कळंबोली शहरात येणारा रस्ता खोदून चप्पलच्या टपरीसाठी लाईट घेण्याचे काम सुरू होते. याची माहिती कळंबोली येथील सिडकोचे कार्यकारी अधिकारी विलास बनकर यांना फोन वरून देण्यात आली असता आम्ही काय करणार लोक सुटीचा दिवस पाहून रस्ते खोदत आहेत, असे बेजाबदारपणे उत्तर त्यांनी दिले.
या वसाहतीतील रस्ते जागोजागी खोदून तसेच सोडण्यात आल्याने रस्ते दयनीय अवस्थेत गेले आहेत. या रस्त्याच्या दुरवस्थेमुळे अपघात होऊन नागरिकांना इजा होत आहेत. काहींना हात, पाय गमावण्याची वेळ येत आहे. गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे तेव्हा एकदा काय ते रस्ते खोदून कामे करा आणि नंतर रस्ते बनवा, अशी विनंती नागरिक करत आहेत.
सिडको अधिकार्याच्या संगनमताने ही अनधिकृत कामे होत असल्याने ज्या दुकादाराने रस्ते खोदून वीज कनेक्शन, केबल, पाण्याची लाईन टाकण्यात आली आहे. रस्ते खोदणार्यांची माहिती देऊनसुद्धा त्यांच्यावर कारवाई होत नाही.
सिडको वसाहतीत रविवारची सुटी बघून रस्ते खोदून केबल, वीज कनेक्शन, पाइपलाइन, मोबाईल टॉवरच्या लाइन टाकत आहेत. त्यामुळे आम्ही काहीच करू शकत नाही.
-विलास बनकर, कार्यकारी अधिकारी, सिडको, कळंबोली
सिडको अधिकार्यांच्या बेजबाबदारपणामुळे येथील नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. पावसाळा सुरू होण्यापूर्वी सेंट जोसेफ रस्ता खोदून पाइपलाइन टाकण्यात आली. तो रस्ता खोदलेल्या अवस्थेत तसाच आहे.
-बबन मुकादम, नगरसेवक, पनवेल महापालिका