Breaking News

बाद नसतानाही युवराजने धरला तंबूचा रस्ता

ओटावा : वृत्तसंस्था

युवराज सिंग याने काही दिवसांपूर्वीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली. निवृत्तीची घोषणा करतानाच त्याने देशांतर्गत ट्वेन्टी-20 स्पर्धेत आणि इतर लीगमध्ये खेळणार असल्याचे स्पष्ट केले होते. त्यानुसार निवृत्तीनंतर त्याने टी-20 कॅनडा या स्पर्धेतून पुनरागमन केले, पण निवृत्तीनंतरच्या पहिल्याच सामन्यात त्याचा ‘डाव’ फसला. आपण बाद झाल्याचे वाटून घेऊन तो बाद नसतानाच तो माघारी परतला.

कॅनडा टी-20 स्पर्धेचा सलामीचा सामना युवराज सिंग कर्णधार असलेल्या टोरोंटो नॅशनल्स आणि खिस ग्रेलच्या नेतृत्वाखालील व्हॅन्कुव्हर नाईट्स या दोन संघांमध्ये झाला. या सामन्यात युवराजच्या फटकेबाजीकडे सार्‍यांचे लक्ष लागले होते, पण तो संथपणे खेळू लागला. क्रिकेटच्या मैदानातील सराव नसल्याने त्याला फारशी चांगली कामगिरी करणे शक्य झाले नाही, मात्र त्यापेक्षा चर्चेचा विषय ठरला तो युवराजच्या बाद होण्याची पद्धत.

गोलंदाजाने टाकलेला चेंडू युवराजच्या बॅटची कड लागून चेंडू यष्टिरक्षकाकडे गेला, पण त्याने तो झेल पकडला नाही. चेंडू यष्टिरक्षकाच्या अंगावर आदळला आणि त्यानंतर स्टंपवर पडला. त्या वेळी युवराजने बाद झालो, असे मानून तंबूचा रस्ता धरला, पण नंतर तो बाद नसल्याचे दिसून आले.

या सामन्यात युवराजने 27 चेंडू खेळून केवळ 14 धावा केल्या. टोरोंटो नॅशनल संघ क्लासेन व पोलार्डच्या खेळीच्या जोरावर 159 धावांपर्यंत मजल मारू शकला.

Check Also

सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान

सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव पनवेल ः रामप्रहर वृत्तइतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक …

Leave a Reply