Breaking News

दीवाळीनिमित्त कलाकारांना व्यासपीठ

नगरसेविका राजश्री वावेकर यांचा उपक्रम; मान्यवरांची उपस्थिती

पनवेल : रामप्रहर वृत्त

भारतीय संस्कृती ही उत्सवांची संस्कृती म्हणून ओळखली जाते. देशातील वेगवेगळ्या राज्यांतील संस्कृती एकमेकांना पूरक स्वरूपाच्या आहेत. सणांच्या निमित्ताने समाजातील कलाकारांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी व्यासपीठाची आवश्यकता असते. अशा वेळी नगरसेविका राजश्री वावेकर यांनी कलाकारांना दिवाळीनिमित्त कार्यक्रमाच्या माध्यमातून व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे तसेच यंदाची दिवाळी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आली असून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 100 कोटी लसींचे कवच आपल्या अवतीभवती उभे केले आहे. त्यामुळे आपण काही अंशी मोकळा श्वास घेऊ शकलो आहोत, असे प्रतिपादन आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले. ते नवीन पनवेल येथे दिवाळीनिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते.

नगरसेविका राजश्री महेंद्र वावेकर यांच्या माध्यमातून दिवाळीनिमित्ताने प्रभाग क्रमांक 16 येथील रहिवाशांसाठी रविवारी (दि. 1) विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यामध्ये कंदिल सजावट, रांगोळी, दिवा सजावट, गायन यांसारख्या विविध स्पर्धांचा समावेश होता. पनवेल शहर भाजप युवा मोर्चाचे सचिव आयुफ अकुला यांनी समन्वयक म्हणून जबाबदारी बजावली. या कार्यक्रमास महापौर डॉ. कविता चौतमोल, सभागृह नेते परेश ठाकूर, स्थायी समिती सभापती संतोष शेट्टी, प्रभाग समिती सभापती समीर ठाकूर, नगरसेवक विकास घरत, भाजप नेते महेंद्र वावेकर, युवा नेते हॅप्पी सिंग, वर्षा प्रशांत ठाकूर, अर्चना परेश ठाकूर, शिवाजी भगत आदी उपस्थित होते.

नगरसेविका राजश्री वावेकर यांनी प्रभागातील रहिवाशांसाठी दिवाळीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केल्याने व प्रभागातील उद्यानात पाणपोई सुरू केल्याने आमदार प्रशांत ठाकूर यांनी राजश्री व महेंद्र वावेकर यांचे कौतुक केले. कार्यक्रमात सहभागी झालेल्या स्पर्धकांना आमदार प्रशांत ठाकूर यांनी शुभेच्छाही दिल्या.

या वेळी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी बोलताना सांगितले की, कोरोनाच्या काळात थांबलेले जीवनमान आता हळूहळू पूर्वपदावर येत आहे. त्यामुळे कलाकारांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी व नागरिकांच्या मनोरंजनासाठी अशा प्रकारच्या विविध कार्यक्रमांचे आयोजन करणे आवश्यक होते. भविष्यातील युग हे स्पर्धात्मक असून शिक्षणाच्या बरोबरीने अतिरिक्त कौशल्य असणेही गरजेचे आहे. यासाठी कलाकारांना वाव देण्याचे काम नगरसेविका वावेकर करीत असून त्यांनी खर्‍या अर्थाने प्रभागातील कलाकारांना उत्तम व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे, असे म्हणत परेश ठाकूर यांनी वावेकर यांच्या कार्याचे कौतुक केले.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply