शारजा ः वृत्तसंस्था
यष्टीरक्षक-फलंदाज जोस बटलरने (67 चेंडूत नाबाद 101 धावा) साकारलेल्या अप्रतिम शतकाच्या जोरावर इंग्लंडने सोमवारी ट्वेन्टी-20 विश्वचषकात श्रीलंकेवर 26 धावांनी मात केली. सलग चौथ्या विजयासह इंग्लंडने उपांत्य फेरीतील प्रवेश जवळपास निश्चित केला आहे. सुपर-12 फेरीतील या सामन्यात इंग्लंडने दिलेल्या 164 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेचा डाव 19 षटकांत 137 धावांत आटोपला. श्रीलंकेचे सलामीवीर पाथुम निसंका (1) आणि कुसाल परेरा (7) लवकर बाद झाले. चरिथ असलंका (21) आणि भानुका राजपक्षे (26) यांच्या योगदानानंतर वानिंदू हसरंगा (34) आणि कर्णधार दसून शानका (26) यांनी फटकेबाजी करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना श्रीलंकेला विजय मिळवून देता आला नाही. तत्पूर्वी, इंग्लंडने 20 षटकांत 4 बाद 163 अशी धावसंख्या उभारली. जेसन रॉय (9), डेव्हिड मलान (6) आणि जॉनी बेअरस्टो (0) झटपट माघारी परतल्याने इंग्लंडची एकवेळ 3 बाद 35 अशी अवस्था झाली, पण बटलर आणि कर्णधार ईऑन मॉर्गन (40) यांनी इंग्लंडला सावरले. मॉर्गन बाद झाल्यावरही बटलरने फटकेबाजी सुरू ठेवताना अखेरच्या चेंडूवर षटकार मारत शतक पूर्ण केले. त्याचे हे आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमधील पहिलेवहिले शतक ठरले. बटलरच्या नाबाद 101 धावांच्या खेळी प्रत्येकी सहा चौकार व षटकारांचा समावेश होता. इंग्लंडने अखेरच्या 10 षटकांत 116 धावा कुठल्या.