रस्ता नसल्याने बीडीओंची पायपीट



कर्जत : बातमीदार
तालुक्यातील ग्रामीण आणि दुर्गम भागात मोठ्या प्रमाणात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. अनेक आदिवासीवाड्या पाण्यासाठी व्याकुळ झाल्या आहेत. त्यामुळे दुर्गम भागातील पिण्याच्या पाण्याची स्थिती जाणून घेण्यासाठी कर्जतचे गटविकास अधिकारी किरवली ग्रामपंचायत हद्दीमधील आदिवासी वाड्यांमध्ये पोहचले.
किरवली ग्रामपंचायत हद्दीमधील किरवली ठाकूरवाडी आणि सावरगाव ठाकूरवाडी अशा दोन वाड्या दुर्गम भागात असून तेथे पोहचायला रस्ताही नाही. किरवली येथे आपली वाहने ठेवून गटविकास अधिकारी बाळाजी पुरी हे सव्वा तासाने किरवली ठाकूरवाडीमध्ये पोहचले. सरपंच दत्तात्रय सांबरी हेदेखील त्यांच्या सोबत होते. त्यांनी तेथील अर्धवट तुटलेल्या विहिरींची पाहणी केली. या विहिरींची दुरुस्ती करण्याची मागणी या ठाकूरवाडीतील ग्रामस्थ गेली चार वर्षे करीत आहेत, मात्र त्याकडे पाहायला पंचायत समितीला वेळ नसल्याची खंत सरपंच सांबरी यांनी व्यक्त केली. विहीर दुरुस्तीचे आश्वासन दिल्यानंतर गटविकास अधिकारी रणरणत्या उन्हात सावरगाव ठाकूरवाडीकडे निघाले.
सावरगाव ठाकूरवाडीत पोचण्यासाठी त्यांना तब्बल दोन तासाची पायपीट करावी लागली. तेथे त्यांनी घरकुलांची पाहणी केली आणि तेथील पाण्याची स्थिती लक्षात घेतली. गटविकास अधिकारी बाळाजी पुरी यांच्या वाडीत येण्याने आमचे प्रश्न सुटतील, असा विश्वास ग्रामपंचायत सदस्या चित्रा पारधी यांनी व्यक्त केला.
गटविकास अधिकारी वाडीत आल्याचा आनंद आम्हाला आहे, पण त्यांनी केवळ आमच्या अडचणी आणि समस्या समजून घेऊन काही फायदा नाही. त्या सोडविण्यासाठी आणि आमच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी काय करता येईल, याकडे त्यांनी लक्ष द्यावे.
दत्तात्रय सांबरी, सरपंच, ग्रुप ग्रामपंचायत-किरवली, ता. कर्जत
किरवली ठाकूरवाडी आणि सावरगाव ठाकूरवाडी दोन्ही ठिकाणी पाणी पोहोचविण्यास कर्जत पंचायत समिती आग्रही असून त्यांची बिले पाणी पुरवठा कृती आराखडा देईल.
-बाळाजी पुरी, गटविकास अधिकारी, कर्जत