माथेरान पोलिसांचा अश्वचालकांना इशारा
कर्जत : बातमीदार
पर्यटकांना चुकीच्या पद्धतीने माहिती पुरविणे, अवाजवी दर आकारणे, विनापरवाना घोडे चालविणे, तसेच नियमांचे पालन न केल्यास कारवाई अटळ असल्याचा इशारा माथेरान पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक संजय बांगर यांनी येथील अश्वचालकांना दिला.
कोरोनाचे निर्बंध शिथिल होताच पर्यटकांची पावले माथेरानकडे वळू लागली असून, दिवाळीच्या सुट्टीत मोठ्या संख्येने येणार्या पर्यटकांची गैरसोय होऊ नये म्हणून स्थानिक प्रशासनाने कंबर कसली आहे. या पार्श्वभूमीवर नगर परिषदेसह पोलीस प्रशासनाने स्थानिक अश्वपालकांना भेडसाविणार्या समस्या जाणून घेतल्या.
माथेरानमध्ये जुन्या परवाने बिल्ल्यांवर राजरोसपणे घोडे चालविणार्या अश्वचालकांवर कायदेशीर कारवाई करावी, तसेच फसवणूक थांबविण्यासाठी पर्यटकांना शहरातील अहिल्याबाई होळकर चौक ते वखारी नाका हा भाग वगळून अन्य ठिकाणी मुभा मिळावी, अशी मागणी अश्वपाल संघटनेच्या अध्यक्षा आशा कदम यांनी या वेळी केली. अश्वपालकांना परवडणारे दर निश्चित करण्याची विनंती लहू शिंगाडे यांनी केली. अश्वचालक म्हणून अल्पवयीन मुलांचा होणारा वापर तत्काळ थांबविण्यात यावा, तसेच उताराच्या ठिकाणी प्लेवर ब्लॉक ऐवजी अन्य पर्याय उपलब्ध करून देण्याची मागणी अश्वपालक संघटनेचे सचिन पाटील यांनी केली.
पर्यटकांना घोडे सवारीची प्रिपेड सेवा देण्याकरिता लवकरच केबिन व्यवस्था करण्यात येईल तसेच प्रेक्षणीय स्थळांवर 2013 सालचे शासकीय दरपत्रक लावण्याचे आश्वासन नगर परिषदेच्या मुख्याधिकारी सुरेखा भणगे यांनी दिले.
माथेरानमध्ये 460 घोड्यांना परवाना असल्याने तितकेच घोडे दिसले पाहिजेत. प्रत्येक पॉइंटवर पर्यटकांना उतरवणे बंधनकारक राहील. दस्तुरी नाक्यावर नियमानुसार फक्त पाचच अश्वपालकांनी गणवेशात उपस्थित रहावे, अशा सूचना सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय बांगर यांनी केल्या. नगराध्यक्षा प्रेरणा सावंत, स्थानिक अश्वपाल संघटना व मुळवासीय अश्वपाल संघटनेचे कार्यकर्ते या वेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पर्यटकांची दिशाभूल, तसेच त्यांच्याकडून जास्त दर आकारणी केल्यास आणि चुकीच्या पद्धतीने माहिती पुरवल्यास फसवणुकीचा गुन्हा दाखल करून सदर घोडेचालकाचा परवाना रद्द करण्यात येईल.
-संजय बांगर, सहाय्यक निरीक्षक,माथेरान पोलीस ठाणे