Breaking News

अनिल देशमुख यांना 6 नोव्हेंबरपर्यंत ईडी कोठडी; दिवाळी जेलमध्ये

मुंबई ः प्रतिनिधी
महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) अटक केली आहे. 100 कोटींची वसुली आणि पैशांच्या अफरातफरीचा (मनी लॉण्डरिंग) आरोप असलेले देशमुख सोमवारी सकाळी अचानक ईडी कार्यालयात हजर झाले होते. 13 तास चौकशी केल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. विशेष न्यायालयाने देशमुख यांना 6 नोव्हेंबरपर्यंत अंमलबजावणी ईडीची कोठडी सुनावली आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून गायब असलेले अनिल देशमुख हे सोमवारी प्रथमच समोर आले आणि ईडीच्या कार्यालयात पोहचले. या वेळी देशमुख यांच्यासोबत त्यांचे वकीलही उपस्थित होते. दिवसभर देशमुख यांची चौकशी झाली. सायंकाळी साडेसातच्या सुमारास दिल्लीतील काही अधिकारी ईडी कार्यालयात दाखल झाले. त्यानंतर पुन्हा देशमुख यांची चौकशी झाली आणि अखेर रात्री उशिरा त्यांना ईडीकडून अटक करण्यात आली.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख यांच्यावर निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे याच्याकडून 100 कोटींची वसुली केल्याचा आरोप केला होता. या प्रकरणी ईडीने तपास करीत देशमुख यांच्या घर आणि कार्यालयावर छापे टाकले होते. ईडीच्या अटकेची कारवाई टाळण्यासाठी देशमुख यांनी मुंबई उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली, पण कोर्टाने त्यांची याचिका फेटाळून लावली होती.
‘चुकीला माफी नाही‘
अनिल देशमुख यांच्या अटकेवर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मार्मिक प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. कुणाचाही कार्यकर्ता असू दे. चुक माफ केली जाणार नाही, असे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 2014मध्ये सांगितले होते. देशातून, राज्या-राज्यांतून भ्रष्टाचाराला हद्दपार करायचेय. देशमुखांच्या बाबतीत शेवटी हे व्हायच तेच झाले. ईडीने अनेक वेळा समन्स देऊनही ते हजर राहिले नाही. शेवटी चुकीला माफी नाही, असे पाटील म्हणाले.

Check Also

उलवे नोड येथील शकुंतला रामशेठ ठाकूर स्कूलमध्ये विज्ञान प्रदर्शन उत्साहात

उलवे नोड ः रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या उलवे नोड येथील शकुंतला रामशेठ ठाकूर स्कूलमध्ये …

Leave a Reply