Breaking News

पनवेलमध्ये विविध विकासकामांचे भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्त

महापालिका क्षेत्राचा विकास करण्यासाठी भारतीय जनता पार्टी कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन आमदार प्रशांत ठाकूर यांनी बुधवारी (दि. 3) विकासकामांच्या भूमिपूजनाच्या वेळी केले. पनवेल महापालिकेच्या वतीने नागरिकांना दिवाळी भेट म्हणून अनेक विकासकामांच्या शुभारंभ करण्यात आला आहे. त्याअंतर्गत महापालिकेच्या  प्रभाग समिती अ आणि ब मधील विविध विकासकामांचे भूमिपूजन आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते झाले. या वेळी सुमारे साडेआठ ते नऊ कोटी रुपयांच्या कामांना एकाच वेळी सुरुवात झाली.

पनवेल महापालिकेच्या माध्यमातून रोडपाली-बौद्धवाडी येथील कासाडी नदी लगतच्या दगडांचे पिचिंग, कोपरा गावातील रस्त्यांचे काँक्रिटीकरण व गावातील समाज मंदिराची डागडुजी व सुशोभीकरण, धामोळे गावातील रस्त्यांचे काँक्रिटीकरण, ओवे गावातील गटार बांधकाम, पेठ गावातील रस्त्यांचे काँक्रिटीकरण व गटार बांधणे, पापडीचा पाडा येथे रस्त्याचे काँक्रिटीकरण व गटारे, तसेच खुटुक बांधण आणि इनामपुरी येथील रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्यात येणार आहे. या विकासकामांचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह मान्यवरांच्या प्रमुख उपस्थित भूमिपूजन झाले. त्यावबरोबर खुटारी, एकटपाडा, रोहिंजण, किरवली, नागझरी आणि वळवली येथील रस्त्यांचे काँक्रिटीकरण आणि धरणा, धरणा कॅम्प, तळोजा मजकूर, घोट गावातील रस्त्यांचे काँक्रिटीकरण व गटारे बांधण्याचे काम महापालिकेच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. या कामांचेही भूमिपूजन भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत झाले.

या वेळी आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले की, पनवेल महापालिका क्षेत्राचा विकास करणे ही आमची जबाबदारी आहे आणि त्या भावनेतून आम्ही या सर्व परिसराचा, तसेच गावांच्या विकासासाठी काम करत आहोत. त्या दृष्टिकोनातून महापालिका क्षेत्रातील सर्व समस्या सोडविण्यासाठी भाजप कटिबद्ध आहे. जनतेने आमच्यावर टाकलेला विश्वास सार्थ ठरवण्यासाठी आम्ही सदैव तत्पर राहू, अशी ग्वाहीही त्यांनी या वेळी दिली. भारतीय जनता पार्टी जे बोलते ते करून दाखवते या शब्दावर आपल्या कार्यकर्त्यांचा विश्वास आहे. 15 जूनपासून एक व्यक्ती तुरुंगात आहे. तरीही त्यांचे फोटो बॅनरवर लागतात, त्यांचा गौरव होतो, त्यांनी बुडवलेले 520 कोटी रुपये कुठे आहेत. त्याचा हिशेब त्यांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मागत नाहीत. राज्यात आपली सत्ता नसली तरीही कोरोनाच्या दीड वर्षाच्या कालावधीत आपण माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि भाजपच्या माध्यमातून पावणेआठ कोटी रुपयांच्या सामानाचे गावोगाव घरांमध्ये वाटप केले, असे या वेळी आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले.

या विकासकामांच्या भूमिपूजनावेळी भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, महापौर डॉ. कविता चौतमोल, सभागृह नेते परेश ठाकूर, प्रभाग समिती अ सभापती अनिता पाटील, समीर ठाकूर, नगरसेवक अनिल भगत, हरेश केणी, नितीन पाटील, अभिमन्यू पाटील, बबन मुकादम, अमर पाटील, नरेश ठाकूर, रामजी बेरा, निलेश बावीस्कर, पापा पटेल, संतोष भोईर, महादेव मधे, नगरसेविका विद्या गायकवाड, संजना कदम, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद केणी, पनवेल तालुका उपाध्यक्ष सचिन पाटील, कळंबोली शहराचे अध्यक्ष रविनाथ पाटील, खारघर शहर अध्यक्ष ब्रिजेश पटेल, भाजप नेते अ‍ॅड. जितेंद्र वाघमारे, युवा मोर्चा अध्यक्ष विनोद घरत, शशिकांत शेळके, प्रतिभा भोईर, मन्सूर पटेल, प्रभाकर जोशी आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply