Breaking News

महाविकास आघाडी पुन्हा धूसफुस

जयंत पाटील, नाना पटोलेंच्या वक्तव्यावरून नाराजी उघड

मुंबई : प्रतिनिधी
शिवसेनेने विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी आमदार अंबादास दानवे यांची निवड केल्यानंतर महाविकास आघाडीत नाराजीचा सूर उमटला आहे. आम्हाला या निवडीवेळी विश्वासात घेतले नसल्याचे मत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केले आहे, तर आमची नैसर्गिक आघाडी नाही, ही तात्पुरती आघाडी आहे असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले आहेत. त्यांच्या या वक्तव्यावरून महाविकास आघाडी फुटीच्या मार्गावर असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.
आमची नैसर्गिक आघाडी नसून ही आघाडी एका विपरीत परिस्थितीत तयार झाली आहे. आम्ही विरोधी पक्षात बसणार होतो पण जी युती झाली ती पर्मनंट नाही, असे पटोले म्हणाले होते. त्यानंतर पक्षाने जो निर्णय घेतला तो आम्हाला मान्य असेल, असे मत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त केले आहे.
दरम्यान, आम्हाला या निवडीवेळी विश्वासात घेतले नसल्याचे मत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केले आहे, तर विधान परिषदेच्या निवडीवर आता शिक्कामोर्तब झाले असून त्यावर आम्हाला वाद वाढवायचा नाही, असे मत अजित पवारांनी व्यक्त केले. त्यामुळे अंबादास दानवे यांच्या निवडीवर काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून जाहीर नाराजी व्यक्त केली जात असल्यामुळे महाविकास आघाडी फुटणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.
शिवसेनेत फूट पडल्यापासून महाविकास आघाडीतील तिनही पक्षांचे ’एकला चलो रे’चे धोरण पहायला मिळाले आहे. विधान परिषदेच्या निवडीवेळीच महाविकास आघाडीतील प्रत्येक पक्षाने अप्रत्यक्षरित्या आपापले उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न केला होता, पण काँग्रेसच्या चंद्रकांत हंडोरे यांचा पराभव झाल्यानंतर आरोप-प्रत्यारोप सुरू झाले होते. त्यानंतर राज्यात सत्तांतर झाल्यावर आता महाविकास आघाडीतील मित्रपक्षांची नाराजी उघड होत आहे.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply