अक्कलकोट : प्रतिनिधी
सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी दिवाळीत आयोजित केलेल्या स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमात प्रसिद्ध डान्सर सपना चौधरी हिच्या नाच गाण्याचा कार्यक्रम ठेवला होता. यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी हे नाच गाणे करण्यात मग्न आहेत, अशी धनंजय मुंडे यांच्यावर टीका केली. धनंजय मुंडे यांनी तीन दिवसांपूर्वी भाजपवर टीका केली होती. त्यावरून देवेंद्र फडणवीस म्हणाले की, अरे वेड्या, भाजप मुंबईच्या मातीतून उभी राहिली आहे. आम्हाला मातीत गाडणारे स्वतः गाडले गेले, आम्हाला गाडू शकले नाही. एकीकडे शेतकर्यांच्या आत्महत्या चाललेल्या आहेत, एसटी संप सुरू आहे आणि हे नाच गाणे करण्यात मग्न आहेत, हे आम्हाला सांगून राहिले मातीत गाडून टाकू, भाजपचा कार्यकर्ता हादेखील तुम्हाला पुरेसा आहे, असे फडणवीस म्हणाले. फडणवीस यांच्या हस्ते अक्कलकोट इथे विविध कामांचे लोकार्पण आणि भूमिपूजन झाले. त्या वेळी कार्यक्रमात फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली.