- देवेंद्र फडणवीस यांचा खळबळजनक आरोप
- जमीन खरेदीबाबतचे पुरावे सादर
मुंबई : प्रतिनिधी
ज्यांनी मुंबईत बॉम्बस्फोट घडविले, जे मुंबईचे मारेकरी आहेत, त्यांच्याशी मंत्री नवाब मलिक यांचे आर्थिक संबंध कसे, असा सवाल माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज उपस्थित केला. सरदार शहा वली खान आणि मोहम्मद सलीम इशाक पटेल उर्फ सलीम पटेल या दोघांशी केलेले आर्थिक व्यवहार आणि त्यांच्याकडून कोट्यावधींची जमीन कवडीमोल भावात कशी खरेदी केली, याचे पुरावेच त्यांनी सादर केले.
महाराष्ट्र भाजपा कार्यालयात मंगळवारी (दि. 9) ही पत्रकार परिषद झाली. या वेळी विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आशीष शेलार, अतुल भातखळकर, सदाभाऊ खोत, किसन कथोरे, केशव उपाध्ये आदी उपस्थित होते.
या वेळी फडणवीस म्हणाले की, मी घोषणा केली होती की काही गोष्टी दिवाळीनंतर तुमच्यासमोर आणेन. थोडा उशीर झाला. कारण कागद गोळा करत होतो, काहींचे पत्रकार परिषदेचे दिवस आधीच बुक होते. मी सांगणार आहे ती सलीम जावेदची स्टोरीही नाही आणि इंटरव्हलनंतरचा सिनेमाही नाही. फार गंभीर आणि देशाच्या सुरक्षेशी जोडलेला हा मुद्दा आहे.
सरदार शहावली खान हा 1993चा गुन्हेगार आहे. याला जन्मठेपेची शिक्षा झाली असून तो तुरुंगात आहे. सर्वोच्च न्यायालयाने ती शिक्षा कायम केली आहे. मोहम्मद अली इशाक पटेल उर्फ सलीम पटेल. तो हसीना पारकरचा बॉडीगार्ड, ड्रायव्हर, फ्रंटमॅनही होता. हसीना पारकरला 2007मध्ये अटक झाली, तेव्हा सलीम पटेललाही अटक झाली. दाऊदनंतर हसीना पारकरच्या नावाने संपत्ती गोळा केली जायची. सलीम पटेलच्या नावाने पॉवर ऑफ अॅटर्नी करून पैसा गोळा केला जायचा. हा सलीम पटेल जमीन लाटण्याच्या धंद्यातला सर्वात प्रमुख माणूस होता.
कुर्ल्यामध्ये 2.80 एकर म्हणजेच एक लाख 23 हजार स्क्वेअर फुटाची जागा ज्याला गोवावाला कम्पाऊंड असे म्हटले जाते. कुर्ल्यात एलबीएस रस्त्यावर ही जागा आहे. या जमिनीची एक रजिस्ट्री सॉलिडस नावाच्या कंपनीसोबत झाली. मरियमबाई गोवावाला, मुदीरा प्लंबर या दोघांकडून सलीम पटेल हे पॉवर ऑफ अॅटर्नी होल्डर आहे. विक्री करणारा सरदार शहावली खान आहे. म्हणजे या दोघांनी मिळून या जमिनीची विक्री सॉलिडस कंपनीला केली. ही कंपनी नवाब मलिक यांच्या कुटुंबीयांची आहे. घेणार्याची सही फराज मलिक नावाच्या व्यक्तीची आहे. या सॉलिडसमध्ये 2019मध्ये खुद्द नवाब मलिक देखील होते. आजही त्यांच्या कुटुंबाचे लोक त्यात आहेत.
कुर्ल्याच्या फोनिक्स मार्केटच्या जमिनीवेळीच एलबीएस रोडवरची ही जमीन रेडीरेकनर रेट 8500 आणि मार्केट रेट 2053 रुपये प्रती चौरस फूट दराने घेतली गेली. ही जमीन 30 लाखांत खरेदी केली गेली. त्यातही 15 लाखांचं पेमेंट हे मालकाला न मिळता त्यांचा पॉवर ऑफ अॅटर्नी होल्डर सलीम पटेलच्या खात्यात जमा झाले. त्यानंतर 10 लाख रुपये शहावली खान ज्याला सरदार खान म्हणतात, त्याला मिळाले. त्यातही 5 लाख नंतर मिळतील असं लिहिलं. म्हणजे 20 लाखात एलबीएस रोडवर तीन एकरच्या जमिनीचा व्यवहार झाला.
2003मध्ये हा सौदा झाला, तेव्हा नवाब मलिक मंत्री होते. अंतिम रजिस्ट्री झाली त्याच्या काही दिवस आधी नवाब मलिक यांना पद सोडावे लागले, पण तुम्हाला माहिती नव्हते की सलीम पटेल कोण आहे? मुंबईच्या गुन्हेगारांकडून तुम्ही जमीन खरेदी का केली? मुंबईत बॉम्बस्फोट करणार्यांकडून तुम्ही जमीन का खरेदी केली? अशा कोणत्या कारणामुळे त्यांनी एलबीएसमधली तीन एकरची जमीन इतक्या स्वस्तात दिली. या आरोपींवर टाडा लागला होता. टाडाच्या कायद्यानुसार आरोपीची सगळी मालमत्ता सरकार जप्त करते. मग टाडाच्या आरोपीची जमीन जप्त होऊ नये, यासाठी तुम्हाला ट्रान्सफर केली गेली का?
या सगळ्या व्यवहारात फार गोंधळ आहे. 2003मध्ये याच मालमत्तेमध्ये ते टेनंट देकील झाले, मग ट्रान्सफर केली, मग पुन्हा खरेदी केली. हा थेट अंडरवर्ल्डशी संबंध दिसतोय. मला या गोष्टीचं दुःख आहे. मुंबई बॉम्बस्फोटाच्या दुर्दैवी घटनेची तुम्ही आठवण काढा. हा कट ज्यांनी रचला, रेकी केली, आरडीएक्स भरले अशा व्यक्तीसोबत तुम्ही व्यवहार करता? अशा एकूण 5 मालमत्ता आहेत, ज्यापैकी चारमध्ये 100 टक्के अंडरवर्ल्डचा संबंध आहे. 2005पासून दोन वर्षांपूर्वीपर्यंतचे हे व्यवहार आहेत. मुंबईच्या खुन्यांशी तुम्ही व्यवहार का केला? मी ही कागदपत्रे संबंधित यंत्रणेकडे देईन. हे सगळे पुरावे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनाही मी देणार आहे. त्यांनाही कळेल की त्यांच्या मंत्र्यांनी काय करून ठेवले आहे, असेही शेवटी देवेंद्र फडणवीस म्हणाले.