मुरूड : प्रतिनिधी
मुरूड तालुक्यातील राजपुरी ग्रामपंचायत हद्दीतील ऐतिहासिक जंजिरा किल्ला 1 सप्टेंबरपासून पुन्हा खुला होणार आहे. 1 जून ते 31 ऑगस्ट या काळात समुद्र खवळलेला असल्याने सुरक्षिततेच्या कारणास्तव पुरातत्त्व खाते व मेरीटाईम बोर्डामार्फत हा किल्ला बंद ठेवण्यात आला होता.
सुप्रसिद्ध जंजिरा किल्ला पाहण्यासाठी दरवर्षी पाच लाखांपेक्षा अधिक पर्यटक येत असतात. त्यामुळे स्थानिक लोकांना रोजगार मिळतो. जंजिरा किल्ल्यात जाण्यासाठी राजपुरी व खोरा बंदर येथून प्रवासी जलवाहतुकीची व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली आहे. मागील तीन महिन्यांपासून बंद असलेला किल्ला 1 सप्टेंबरपासून पुन्हा खुला होणार आहे. त्यामुळे बोटींवर काम करणारे तसेच इतर व्यावसायिकांना रोजगार उपलब्ध होणार आहे.
ऐतिहासिक जंजिरा किल्ल्याचे दरवाजे 1 सप्टेंबरपासून उघडणार आहोत, परंतु किल्ला पाहण्यासाठी पर्यटकांना आणखी दोन-तीन दिवस वाट पहावी लागेल, कारण हा किल्ला तीन महिन्यांपासून बंद असल्याने परिसरात झाडेझुडपे मोठ्या प्रमाणावर वाढली आहेत. त्यामुळे विंचू, सरपटणारे प्राणी यांच्यापासून पर्यटकांना धोका निर्माण होऊ शकतो. पर्यटकांचे रक्षण करणे व किल्ल्याची अंतर्गत स्वच्छता करणे गरजेचे आहे. यासाठी पर्यटकांनी आम्हाला सहकार्य करावे.
-बजरंग येलीकर, सहाय्यक संवर्धक अधिकारी, पुरातत्व विभाग