Breaking News

कोपर येथील स्मशानभूमी तोडायला आलेल्या सिडकोच्या पथकाला रोखले

लोकनेते रामशेठ ठाकूर व ग्रामस्थांचा आक्रमक पवित्रा

उलवे नोड : रामप्रहर वृत्त
उलवे नोड ः रामप्रहर वृत्त
गव्हाण ग्रामपंचायत हद्दीतील कोपर येथील गावकीची स्मशानभूमी तोडण्यासाठी सिडकोचे पथक गुरुवारी (दि. 9) आले होते, मात्र ही स्मशानभूमी पूर्वापार असून ती तोडू देणार नाही, असा आक्रमक पवित्रा माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर व ग्रामस्थांनी घेतला आणि कारवाई करण्यापासून सिडकोला रोखले.
या वेळी गव्हाण ग्रामपंचायतीचे उपसरपंच विजय घरत, भाजप कोपर अध्यक्ष सुधीर ठाकूर, युवा कार्यकर्ते किशोर पाटील, ग्रामपंचायत सदस्य रोशन म्हात्रे, कोपर गाव कमिटी अध्यक्ष वैभव घरत, मनोज घरत, ज्येष्ठ कार्यकर्ते भालचंद्र भोईर, अ‍ॅड. राहुल घरत, कमलाकर घरत, महेश घरत, भास्कर घरत आदी पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी उपस्थितांनी ‘गावकर्‍यांच्या एकजुटीचा विजय असो’, ‘लोकनेते रामशेठ ठाकूर आगे बढो, हम तुम्हारे साथ है’, अशा घोषणा दिल्या.
कोपर येथील स्मशानभूमी अनेक वर्षे त्या जागेत असून गावातील मयत व्यक्तींवर तेथे अंत्यसंस्कार करण्यात येतात. असे असताना ही स्मशानभूमी तोडण्यासाठी सिडकोचे पथक फौजफाट्यासह आले होते. या वेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी तेथे ठिय्या देत स्मशानभूमी हा येथील ग्रामस्थांचा हक्क आहे. त्यामुळे ती तोडू देणार नाही, असा आक्रमक पवित्रा घेतला. गावकरीही त्यांच्यासोबत ठामपणे उभे राहिले.
या वेळी लोकनेते रामशेठ ठाकूर म्हणाले की, कोपर गावची स्मशानभूमी अतिशय जुनी असून कमीत कमी 15-20 पिढ्यांच्या आधीपासून इथे आहे. मी कोपरमध्ये शाळेत येत असताना, आमच्या लहानपणी एखाद्या नातेवाईकाचे मयत झाले तर आम्ही इथे येत होतो. त्यानंतरही अनेकदा आलेलो आहे. येथील स्मशानभूमीचे बांधकाम करा, अशी मागणी आम्ही सिडकोकडे अनेकदा केली आहे. त्यानुसार त्यांनी इस्टिमेट बनविले. 2020 साली टेंडरही काढले. तेव्हा ही स्मशानभूमी त्यांना चालत होती. आज चालत नाही हे दुर्दैव आहे. पिढ्यान् पिढ्या असलेली ही स्मशानभूमी आहे, मात्र सिडको नाहक त्रास देत आहे. कोपर गाव, तळ्याचा पाडा, इतर कॉलनीतील लोक आलेले आहेत. जर त्यांचे नातेवाईक वारले तर त्यांना ही स्मशानभूमी सोयीची होती, पण याच्याऐवजी सिडकोने येथील स्मशानभूमी शेलघरच्या पुढे सेक्टर 14 येथे दोन किलोमीटरपेक्षाही जास्त अंतरावर नेली आहे. हा सगळ्या लोकांना त्रास आहे. त्यामुळे हे उचित होणार नाही. सिडकोने गाववाल्यांना अडथळा आणू नये. अन्यथा पनवेल, उरण, नवी मुंबईतील 95 गावे एकत्र येऊन सिडकोला विरोध करतील. त्यांना सळो की पळो करून सोडतील. म्हणून सिडकोच्या अधिकार्‍यांनी आपला हट्ट सोडावा.
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली गावकरी एकवटल्याचे पाहून अखेर सिडकोने नरमाईची भूमिका घेत कारवाई तूर्त स्थगित केली. या वेळी झालेल्या चर्चेमध्ये या विषयासंदर्भात 20 किंवा 22 नोव्हेंबरला सिडको भवनमध्ये लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली बैठक घेण्याचे ठरले. या वेळी आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, उद्योजक जे.एम. म्हात्रे, कामगार नेते महेंद्र घरत असे सर्वपक्षीय नेते उपस्थित राहणार आहेत.

Check Also

लोकनेते रामशेठ ठाकूर कॉलेज, टीएनजी कॉलेजचा 100 टक्के निकाल

पनवेल : रामप्रहर वृत्त महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी 2024मध्ये घेण्यात …

Leave a Reply