विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांचा घणाघात
मुंबई : प्रतिनिधी
गेल्या काही दिवसांपासून एसटी कर्मचार्यांचे राज्यभरात तीव्र आंदोलन सुरू आहे. एसटीचे राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करावे, या मागणीसाठी कर्मचार्यांची संप पुकारला आहे. संप मागे घेण्यासाठी शासनाने निलंबनाच्या कारवाईचा बडगा कर्मचार्यांवर उचलण्यात आला आहे. त्यावरून विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी राज्य सरकारकडून एसटी कर्मचार्यांवर जुलमी स्वरुपाची कारवाई सुरू असल्याची घणाघाती टीका केली आहे.
भाजपने एसटी कर्मचार्यांना पाठिंबा देत असताना भाजपकडून आघाडी सरकारवर जोरदार हल्लबोल करण्यात येत आहे. यामध्ये प्रवीण दरेकर म्हणाले की, राज्य सरकारकडून एसटी कर्मचार्यांवर जुलमी स्वरुपाची कारवाई सुरू आहे. एसटी बंद करुन खाजगी बसेस सुरु करत आहेत. यातून काही मलिदा लाटण्याचा प्रयत्न सुरू आहे का? एका बाजूला एसटी बंद ठेवायची आणि दुसरीकडे खाजगी वाहतुकीला प्रोत्साहन द्यायचे, हे चुकीचे आहे. मुख्यमंत्र्यांनी भावनिक बोलून एसटी कर्मचारी यांचा प्रश्न सुटणार नाही. अनेक शिवसैनिकांच्या संसाराच्या होळ्या करून शिवसेना उभी राहिली आहे, अशी घणाघाती टीका दरेकर यांनी केली आहे.
भाजपला एसटी कर्मचार्यांच्या प्रश्नावर कुणाची पोळी भाजण्याची गरज नाही. कोणतीही इच्छा असेल तर सर्व काही करता येईल. महाराष्ट्रातील एसटी महामंडळ हे देशातील सर्वांत मोठे महामंडळ आहे. त्यात काही लिकेजस आहेत. ते व्यवस्थित केले तर सर्व काही व्यवस्थित करता येईल, असे दरेकर यांनी सांगितले. दुसरीकडे, नवाब मलिक यांच्यावर अनेक दावे पडलेले आहेत. ज्यांना अब्रुच नाही त्यांच्या अब्रू नुकसानी संदर्भात काय बोलायचे, असा टोला दरेकर यांनी यावेळी बोलताना लगावला.
दरम्यान, राज्य सरकारने आतापर्यंत 918 हून अधिक कर्मचार्यांना निलंबित केले आहे. तरीही संप मागे घेण्यास कर्मचारी तयार नाहीत. आता या आंदोलनाची धग मुंबईच्या मंत्रालयापर्यंत पोहचली आहे.