Breaking News

मलेरिया, डेंग्यू संशयित रुग्णांमध्ये वाढ

नवी मुंबईत डासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पालिकेचे नियोजन

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त

नवी मुंबईमध्ये गेल्या काही दिवसांपासून थंडी, ताप, मलेरिया, डेंग्यू संशयित रुग्णांत वाढ झालेली दिसून येत आहे. नागरिकांमध्ये ताप थंडीची लक्षणे असलेले रुग्ण वाढताना दिसत आहेत. आतापर्यंत मलेरियाचे 40 रुग्ण सापडले आहेत. गेल्या वर्षी फक्त 26 रुग्ण होते. यामुळे महापालिका प्रशासनाने शहरात उपाययोजना सुरू केल्या आहेत.

डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी गेल्या वर्षभरात 4317 ठिकाणी गप्पी मासे सोडले असून यात नवीन 1235 ठिकाणी गप्पी मासे सोडण्यात आले आहेत. शहरातील अंतर्गत झाकण बंद असलेली मुख्य गटारे स्वच्छ करता येत नसल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.

कोपरखैरणे, कोपरी गाव, जुहूगाव, घणसोली व ऐरोली या ठिकाणी डासांचा अधिकचा प्रादुर्भाव आहे. या ठिकाणी अंधार होण्याआधीच घरांची दारे, खिडक्या बंद होत आहेत. घणसोलीच्या मध्य भागातून मोठा नाला गेला असून तो बहुतांश ठिकाणी उघडा आहे. त्यामुळे या नाल्यालगत राहत असलेल्या रहिवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. दुर्गंधी तर पाचवीलाच पुजलेली आहे, आता डासांमुळे दारे खिडक्या बंद करून बसावे लागत असल्याचे येथील नागरिकांचे म्हणणे आहे. कोपरखैरणे भाग हा खाडीलगत असल्याने या ठिकाणी अधिक प्रादुर्भाव आहे. हवामानात बदल झाल्याने देखील डासांचे प्रमाण वाढले आहे.

सिडको वसाहतीत अंतर्गत घरांच्या पाठीमागून मलनिस्सारण वाहिनी, तर समोरून अंतर्गत छोटी, मुख्य गटारे आहेत. पूर्वी अंतर्गत रस्त्याला लागूनच पदपथ आणि त्याखाली झाकण बंद गटारे होती. रस्ता रुंदीकरणात ती बंदिस्त झाली असून झाकणे उघडता येत नाहीत. त्यामुळे औषध फवारणी व इतर उपाययोजना करता येत नसल्याने डासांचे प्रमाण वाढले आहे. तसेच सिडको वसाहतीतील घरांच्या मागील बाजूने 15 वर्षे जुने असलेली मलिनिस्सारण वाहिनी आहे. नवीन बांधकामे होत असताना ही वाहिनी खाली दबली गेली आहे. त्यामुळे या ठिकाणी स्वच्छता करता येत नाही. अशा अनेक कारणांनी शहरात डासांची उत्पत्ती वाढली असून थंडी, ताप, मलेरिया, डेंग्यू संशयित रुग्णांत वाढ होत आहे.

डास उत्पत्ती शोध महिमेअंतर्गत महापालिका प्रशासनाने आतापर्यंत 84,671 घरांना भेटी दिल्या असून त्यापैकी 356 घरांत डास उत्पत्ती आढळून आली आहे. तसेच 81,212 घरांना भेटी देत 785 जणांचे रक्त नुमने व 1235 मास रक्त नुमने घेण्यात आले आहेत. जानेवारी ते नोव्हेंबर या कालावधीत 78,925 संशयित मलेरिया रुग्णांचे रक्त नमुने घेण्यात आले होते. त्यापैकी 40 जणांना मलेरिया झाल्याचे समोर आले आहे.

धुरीकरण, फवारणी सुरू

कोरोना रुग्णांत घट होत असताना शहरात मेलेरियाने डोके वर काढले आहे. आता हिवाळा सुरू झाला असून डासांचा प्रादुर्भावदेखील वाढला आहे. त्यामुळे महापालिकेने धुरीकरण, फवारणी, गप्पी मासे सोडणे आदी उपाययोजना करणे सुरू केले आहे. पालिकेच्या पाहणीत 356 घरात डास उत्पत्ती केंद्रे आढळली आहेत.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply